वाहतूक कोंडीवर स्मार्ट उपाय! PCMC च्या संशोधकांची राष्ट्रीय स्तरावर दखल

वाहतूक कोंडीवर स्मार्ट उपाय! PCMC च्या संशोधकांची राष्ट्रीय स्तरावर दखल

पिंपरी | २६ नोव्हेंबर २०२६ : शहरांमधील वाढती वाहतूक कोंडी, चौकांतील अवजड वाहनांच्या यू-टर्नमुळे निर्माण होणारे अडथळे आणि घाटरस्त्यांवरील अपघातांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधील संशोधकांनी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अभिनव उपाय सुचविले आहेत. हैदराबाद येथे पार पडलेल्या इंडियन रोड्स काँग्रेसच्या (IRC) ८५ व्या राष्ट्रीय वार्षिक अधिवेशनात रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या (पीसीसीओईआर) संशोधनाची विशेष दखल घेण्यात आली.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (पीसीईटी) सचिव विठ्ठल काळभोर यांच्या ‘व्हेईकल क्लास बेस्ड सिक्वेन्शियल यू-टर्न जिओमेट्री’ आणि ‘स्ट्रिक्टली सेग्रिगेटेड मल्टी-डेक अर्बन ब्रिजेस’ या दोन अभियांत्रिकी संकल्पना तसेच पीसीसीओईआरचे संशोधन व विकास विभागाचे अधिष्ठाता डॉ. सुदर्शन बोबडे यांच्या ‘स्मार्ट घाट रोड सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टिम’ या संशोधनाचे सादरीकरण करण्यात आले. पीसीसीओईआरचे संचालक डॉ. हरीश तिवारी आणि डॉ. बोबडे यांनी संयुक्तपणे हे सादरीकरण केले.

हैदराबादमधील हायटेक प्रदर्शन केंद्रात आयोजित अधिवेशनाच्या शैक्षणिक क्षेत्रासाठीच्या तांत्रिक सत्र क्रमांक दोनमध्ये ‘सुरक्षित घाटरस्ते आणि भारतातील शहरी वाहतूक व्यवस्थापनासाठी स्मार्ट वाहतूक प्रणाली’ या विषयावर संशोधन मांडण्यात आले.

इंडियन रोड्स काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा कर्नाटक सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी सचिव डॉ. के. एस. कृष्णा रेड्डी यांनी या तिन्ही संकल्पनांचे विशेष कौतुक केले. घाटरस्त्यांवरील अपघातांच्या प्रसंगी स्मार्ट सुरक्षा प्रणाली उपयुक्त ठरू शकते, असे त्यांनी सांगितले.

शहरातील प्रमुख चौकांमध्ये अवजड वाहनांना यू-टर्न घेण्यासाठी अधिक जागा लागते. परिणामी, वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांब रांगा आणि सुरक्षिततेचे प्रश्न निर्माण होतात. या समस्येवर विठ्ठल काळभोर यांनी वाहनांच्या प्रकारानुसार स्वतंत्र यू-टर्न मार्ग विकसित करण्याची संकल्पना मांडली आहे.

यामध्ये हलक्या वाहनांसाठी आतील वळण मार्ग, तर अवजड वाहनांसाठी अधिक रुंद बाहेरील वळण मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. अशा रचनेमुळे चौकांतील वाहतुकीचे अडथळे कमी होऊन वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत होण्यास मदत होऊ शकते.

वाढत्या शहरी वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी विठ्ठल काळभोर यांनी वाहनांच्या प्रकारानुसार वाहतुकीचे स्वतंत्र स्तर निश्चित करणाऱ्या बहुस्तरीय पुलांची संकल्पनाही मांडली आहे.

या संकल्पनेनुसार उन्नत स्तरावरील पुलावर हलक्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग, त्याखाली अवजड वाहने आणि ट्रकसाठी स्वतंत्र मार्ग, तर जमिनीवरील सेवा रस्त्यांवर दुचाकी, तीनचाकी, स्थानिक बस आणि कमी अंतराच्या वाहतुकीसाठी व्यवस्था प्रस्तावित करण्यात आली आहे.

या संकल्पनेच्या संरचनात्मक विश्लेषणानुसार, लाईव्ह लोड मोमेंटमध्ये ७५ ते ८० टक्क्यांपर्यंत घट, तर पुलाच्या अधिसंरचनेच्या बांधकाम खर्चात ३५ ते ४५ टक्क्यांपर्यंत बचत होण्याची शक्यता अभ्यासातून मांडण्यात आली आहे.

डॉ. सुदर्शन बोबडे यांनी घाटरस्त्यांवरील तीव्र वळणे, अरुंद रस्ते, भूस्खलन, अपुरी दूरसंचार सुविधा आणि अपघातानंतर वाहनांचा शोध घेण्यास होणारा विलंब या समस्यांवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय सुचविले आहेत.

सौर आणि पवन ऊर्जेवर कार्यरत स्मार्ट आयओटी पोल्सच्या माध्यमातून धोकादायक वळणांवरील वाहनांचे निरीक्षण, माहिती संकलन आणि आपत्कालीन संदेशवहनाची एकात्मिक यंत्रणा उभारण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे. यासाठी जीआयएस (GIS), कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) या तंत्रज्ञानाचा वापर प्रस्तावित आहे.

या संशोधनातील ‘टीआयव्हीए – टाइम बाउंड इंटेलिजंट व्हेईकल अकाउंटेबिलिटी सिस्टिम’ (TIVA) ही महत्त्वाची संकल्पना आहे. या प्रणालीमध्ये जीआयएसच्या माध्यमातून धोकादायक ठिकाणांची ओळख, एएनपीआर कॅमेऱ्यांद्वारे वाहन क्रमांकाची स्वयंचलित नोंद आणि वाहनांच्या प्रवासाचा निर्धारित वेळेनुसार मागोवा घेण्याची व्यवस्था प्रस्तावित आहे.

एखादे वाहन निर्धारित वेळेत पुढील निरीक्षण केंद्रावर पोहोचले नाही, तर प्रणालीद्वारे स्वयंचलित अलर्ट निर्माण होईल. त्यामुळे संबंधित वाहनाचा शेवटचा ज्ञात ठावठिकाणा शोधण्यास मदत होऊ शकते. अपघातग्रस्त अथवा दुर्गम भागात अडकलेल्या वाहनांचा शोध घेण्यासाठी आणि बचावकार्याला गती देण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरू शकते. अंबेनळी घाटासारख्या धोकादायक घाटमार्गांवर या प्रणालीचा प्रायोगिक वापर करण्याची संकल्पनाही संशोधनात सुचविण्यात आली आहे.

या तांत्रिक सत्राचे अध्यक्ष डॉ. के. एस. कृष्णा रेड्डी, तर सहअध्यक्ष सीएसआयआरच्या वरिष्ठ प्रधान वैज्ञानिक डॉ. मुक्ती अडवाणी होत्या. आयआयटी मुंबई, आयआयटी रोपार, आयआयटी कानपूर, आयआयटी हैदराबाद आणि एनआयटी वारंगल या प्रतिष्ठित संस्थांमधील संशोधक व प्रतिनिधींच्या उपस्थितीत पीसीसीओईआरच्या संशोधनाचे सादरीकरण करण्यात आले.

या राष्ट्रीय स्तरावरील कामगिरीबद्दल पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी पीसीसीओईआरचे संचालक डॉ. हरीश तिवारी आणि डॉ. सुदर्शन बोबडे यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories