कामगारांच्या सांस्कृतिक भवनाचा प्रश्न ऐरणीवर ; डॉ. चव्हाण यांचे एकजुटीचे आवाहन

कामगारांच्या सांस्कृतिक भवनाचा प्रश्न ऐरणीवर ; डॉ. चव्हाण यांचे एकजुटीचे आवाहन

पिंपरी | २७ नोव्हेंबर २०२६ : पिंपरी-चिंचवडमध्ये श्रमिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी स्वतंत्र सांस्कृतिक भवन उभारण्याचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. खराळवाडीतील कामगार मेळाव्यात या भवनासाठी उपलब्ध होणाऱ्या जागेचा विकास कसा करायचा आणि त्याचा लाभ कामगारांना कसा मिळेल, यावर चर्चा झाली. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कामगारांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र यावे, असे आवाहन डॉ. भारती चव्हाण यांनी केले.

स्व. आण्णासाहेब मगर स्टेडियमच्या मोबदल्यातील भूखंडाच्या विकासावर चर्चा करण्यासाठी गुरुवारी (२६ नोव्हेंबर) खराळवाडी, पिंपरी येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या पिंपरी-चिंचवड शहर शाखेच्या वतीने अल्फा लावल संघटनेचे अध्यक्ष किरण देशमुख यांनी मेळाव्याचे आयोजन केले. विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते आणि गुणवंत कामगार या वेळी उपस्थित होते.

मंडळाच्या अध्यक्षा डॉ. चव्हाण यांनी मगर स्टेडियमसंदर्भातील ३४ वर्षांच्या संघर्षाचा आढावा घेतला. स्टेडियमच्या मोबदल्यात महापालिकेने महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाला देऊ केलेल्या भूखंडावर सांस्कृतिक भवन उभारण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी गुणवंत कामगार कल्याण मंडळाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या प्रक्रियेत कामगारांच्या हिताचा पुरेसा विचार होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

कामगारांच्या श्रमातून उभ्या राहिलेल्या सुविधांचा लाभ त्यांनाच मिळाला पाहिजे, अशी भूमिका डॉ. चव्हाण यांनी मांडली. कामगारांचे संघटन आणि नेतृत्व सक्षम असेल, तर न्याय्य हक्कांसाठीचा लढा यशस्वी होतो. मात्र, राजकारणाचा हस्तक्षेप चळवळीला कमकुवत करतो. त्यामुळे कामगार चळवळ राजकारणापासून दूर ठेवून सर्वांनी एकजुटीने लढा द्यावा, असे त्या म्हणाल्या.

नियोजित सांस्कृतिक भवनातून श्रमिक आणि त्यांच्या कुटुंबीयांचे हित जपण्यासाठी दीर्घकालीन उपक्रम राबवावेत, अशी सूचना मंडळाचे सचिव राजेश हजारे यांनी केली. कार्याध्यक्ष तानाजी एकोंडे यांनी भवनाची रूपरेषा मांडली. कोषाध्यक्ष महंमद शरीफ मुलाणी यांनी पुरस्कारप्राप्त कामगारांना सक्रिय ठेवण्यासाठी मंडळ करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. कामगारांच्या हितासाठी सर्व संघटनांनी एकत्र यावे, असे किरण देशमुख यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले नागरिक आणि शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories