पिंपरी-चिंचवड महापालिका ॲक्शन मोडवर ; सात अनधिकृत बांधकामांवर हातोडा

पिंपरी-चिंचवड महापालिका ॲक्शन मोडवर ; सात अनधिकृत बांधकामांवर हातोडा

पिंपरी-चिंचवड | २७ नोव्हेंबर २०२६ : शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात पिंपरी-चिंचवड महापालिकेची कारवाई सुरू आहे. या मोहिमेंतर्गत शुक्रवारी (२७ नोव्हेंबर) लोकमान्य टिळक रस्त्यावरील ‘सिटी प्राईड’ या व्यावसायिक इमारतीच्या पार्किंग आणि तळमजल्यातील अनधिकृत पत्र्याचे शेड व बांधकामे हटविण्यात आली. या कारवाईत अंदाजे ६४१ चौरस मीटर क्षेत्रावरील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली.

महापालिकेच्या ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक १५ मध्ये ही व्यावसायिक इमारत आहे. इमारतीमधील अनधिकृत पत्र्याचे शेड आणि बांधकामे स्वतःहून हटविण्यासाठी महापालिकेने संबंधित व्यावसायिकांना यापूर्वी नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, निर्धारित मुदत संपल्यानंतरही संबंधितांनी बांधकामे हटवली नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या पथकाने प्रत्यक्ष कारवाई करत इमारतीच्या पार्किंग आणि तळमजल्यातील सात अनधिकृत पत्र्याचे शेड व बांधकामे हटवली.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. ‘अ’ क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे यांच्या देखरेखीखाली उपअभियंता सुशीलकुमार लवटे, राहुल निकम आणि सुहास भगत यांनी कारवाईत सहभाग घेतला.

कारवाईसाठी महाराष्ट्र सुरक्षा दलाचे (एमएसएफ) २० जवान, नऊ मजूर आणि एक जेसीबी ब्रेकर तैनात करण्यात आला होता. महापालिकेच्या निवेदनानुसार, या मोहिमेत एकूण ६४१ चौरस मीटर क्षेत्रावरील सात अनधिकृत शेड व बांधकामे हटविण्यात आली.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories