निगडीतील वाहतूक कोंडीवरून वादंग; सुलभा उबाळेंची ट्रॅव्हल्स प्रतिनिधींशी खडाजंगी

निगडीतील वाहतूक कोंडीवरून वादंग; सुलभा उबाळेंची ट्रॅव्हल्स प्रतिनिधींशी खडाजंगी

निगडी ! २८ नोव्हेंबर २०२६ :  निगडीतील वाहतुक कोंडीच्या मुद्द्यावरून पुन्हा वातावरण तापले आहे. यमुनानगरमधील एलआयसी कॉर्नर ते टिळक चौक मार्गावर ट्रॅव्हल्स बस थांबत असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याची तक्रार आहे.  यापूर्वी लेखी निवेदन देऊनही प्रश्न कायम असल्याने हा मुद्दा चिंचवडच्या वाहतूक शाखेतील बैठकीत पुन्हा उपस्थित झाला. यावेळी नगरसेविका सुलभा उबाळे आणि ट्रॅव्हल्स प्रतिनिधींमध्ये जोरदार वाद झाला. 

यमुनानगरमधील एलआयसी कॉर्नर ते निगडी टिळक चौक या मार्गावर परवानगी नसताना ट्रॅव्हल्स बस थांबवल्या जात असल्याचा मुद्दा नगरसेविका सुलभा उबाळे यांनी बैठकीत मांडला. या मार्गावर ट्रॅव्ह बसेस थांबवल्या जात असल्याने वाहतुकीचा खोळंबा होता. विशेष करून सायंकाळच्या गर्दीच्या वेळी बस रस्त्यावर उभ्या राहिल्याने या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांनाही त्रास सहन करावा लागतो.

बैठकीदरम्यान उबाळे यांनी अनधिकृत पार्किंग आणि वाहतूक कोंडीमुळे होणाऱ्या त्रासाकडे लक्ष वेधले. या मुद्द्यावरून उबाळे आणि ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या प्रतिनिधींमध्ये शाब्दिक वाद झाला. बैठकीला नगरसेवक उत्तम केंदळे आणि बापू घोलपही उपस्थित होते.

याबाबत उबाळे यांनी २ सप्टेंबर २०२६ रोजी या वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्तांना लेखी निवेदन दिले होते. रस्त्यावर अनधिकृतपणे थांबणाऱ्या बसवर कारवाई करावी आणि त्या पर्यायी मार्गाने वळवाव्यात, अशी मागणी त्यांनी निवेदनात केली होती. ट्रॅव्हल्स बससाठी पर्यायी थांब्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही बैठकीत करण्यात आली.  

वाहतूक कोंडीचा प्रश्न अद्यापही सोडवण्यात आल्या नसल्याने हा मुद्दा थेट वाहतूक शाखेच्या कार्यालयात पोहोचला आहे. आता वाहतूक शाखा यासमस्येवर कोणता निर्णय घेते, याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories