पिंपरी | २८ नोव्हेंबर २०२६ : जुने वाहन विकायचे असेल किंवा त्याच्या नोंदणीतील पत्ता बदलायचा असेल, तर आरटीओत जाण्यापूर्वी नंबर प्लेट तपासून घ्यावी लागणार आहे. जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (एचएसआरपी) बसवण्याची मुदत संपली आहे. ही प्लेट नसलेल्या वाहनांना कोणत्या सेवा मिळणार नाहीत, याची माहिती पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिली आहे.
आरटीओने दिलेल्या माहितीनुसार, जुन्या वाहनांना एचएसआरपी बसवण्यासाठी ३० जून २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली होती. ही प्लेट नसल्यास वाहनाची मालकी दुसऱ्याच्या नावावर करता येणार नाही. नोंदणी प्रमाणपत्रावरील पत्ता बदलणे, वाहनाची पुनर्नोंदणी करणे आणि वाहनातील बदलांची नोंद करणे या सेवांवरही निर्बंध आहेत.
वाहन खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाची नोंद चढवणे किंवा कर्ज फेडल्यानंतर ती काढणे, ही कामेही करता येणार नाहीत. वाहनाच्या वाहतूक परवान्याचे (परमिट) नूतनीकरण करता येणार नाही. वाहनाच्या योग्यता प्रमाणपत्राचे (फिटनेस सर्टिफिकेट) नूतनीकरण मात्र या निर्बंधातून वगळले आहे.
केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ मधील नियम ५० नुसार वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसविणे बंधनकारक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांनाही एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे जुन्या वाहनधारकांनाही या नियमाचे पालन करावे लागणार आहे.
जुन्या नंबर प्लेटमुळे वाहनांची अचूक ओळख पटविताना अडचणी निर्माण होतात. वाहनचोरी, अपघात आणि गुन्हेगारी घटनांमध्ये संबंधित वाहनांचा माग काढणे सुलभ व्हावे, यासाठी एचएसआरपी प्रणाली लागू करण्यात आली आहे. या नंबर प्लेटमध्ये वाहनाचा नोंदणी क्रमांक, राज्याचा संकेतांक आणि विशेष सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेश असतो. नंबर प्लेट सहज काढता येऊ नये किंवा तिच्यात फेरफार करता येऊ नये, अशा पद्धतीने तिची रचना करण्यात आली आहे.
खासगी वाहनधारकांसह ऑटोरिक्षा, टॅक्सी, ट्रक आणि बस संघटनांनी आपल्या वाहनांना विलंब न करता एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घ्यावी. वाहन वितरकांनीही यासंदर्भात वाहनधारकांमध्ये जनजागृती करावी, असे आवाहन पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे. एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याकडे दुर्लक्ष न करता संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी वाहनधारकांनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे.