दुर्गादेवी टेकडीवरील वृक्षतोड टळणार? उपमहापौरांची अतिरिक्त आयुक्तांशी चर्चा

दुर्गादेवी टेकडीवरील वृक्षतोड टळणार? उपमहापौरांची अतिरिक्त आयुक्तांशी चर्चा

निगडी | २७ नोव्हेंबर २०२६ : निगडी प्राधिकरण परिसरातील दुर्गादेवी टेकडीवरील वृक्षसंपदेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  पाणीपुरवठा प्रकल्पासाठी टेकडीवरील २२७ झाडे तोडण्याचा प्रस्ताव समोर आल्यानंतर स्थानिक नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर उपमहापौर शर्मिला बाबर यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांची भेट घेतली. टेकडीवरील वृक्षसंपदेचे संरक्षण करण्यासाठी पाणीपुरवठा प्रकल्पाला पर्यायी जागा उपलब्ध होऊ शकते का, याची पडताळणी करण्याची मागणी त्यांनी केली.

दुर्गादेवी टेकडी हा निगडी प्राधिकरण परिसरातील महत्त्वाचा हरित परिसर आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हरित क्षेत्रात वाढ झाली आहे. दररोज सकाळी आणि सायंकाळी व्यायाम, फेरफटका आणि विरंगुळ्यासाठी ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच निसर्गप्रेमी या परिसरात येतात. त्यामुळे टेकडीवरील झाडांचे जतन व्हावे, अशी स्थानिक नागरिकांची अपेक्षा आहे. नागरिकांच्या या भावना उपमहापौर बाबर यांनी प्रशासनासमोर मांडल्या.

शहराची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे महत्त्वाचे आहे. मात्र, विकासकामे करताना पर्यावरणाची हानी टाळण्यासाठीही प्रयत्न झाले पाहिजेत. त्यामुळे टेकडी परिसरातच अन्य योग्य जागा उपलब्ध आहे का किंवा हा प्रकल्प दुसऱ्या ठिकाणी उभारणे शक्य आहे का, याचा अभ्यास करावा, अशी भूमिका उपमहापौर शर्मिला बाबर यांनी मांडली.

प्रस्तावित प्रकल्पाच्या जागेची महापालिकेचा उद्यान विभाग, पाणीपुरवठा विभाग आणि पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञांनी संयुक्तपणे पाहणी करावी. वृक्षतोडीची आवश्यकता, पर्यावरणावर होणारे संभाव्य परिणाम आणि पर्यायी जागांची व्यवहार्यता यांचा सविस्तर अभ्यास करूनच पुढील निर्णय घेण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

पाणीपुरवठ्यासारख्या आवश्यक विकासकामांना प्राधान्य देतानाच शहरातील हरित क्षेत्रांचे संरक्षण होणे गरजेचे आहे. नागरिकांच्या गरजा आणि पर्यावरण संवर्धन यांचा समतोल राखून दुर्गादेवी टेकडीवरील प्रस्तावित प्रकल्पाबाबत योग्य तो पर्याय निश्चित करण्याची सूचना उपमहापौर बाबर यांनी प्रशासनाला केली आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories