पिंपरी | २८ नोव्हेंबर २०२६ : पिंपरी-चिंचवड शहरातील वाढते नागरीकरण आणि विकासकामांच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित वृक्षतोडीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. रस्ता रुंदीकरण, बांधकामे आणि विविध विकास प्रकल्पांसाठी जुन्या व पूर्ण वाढ झालेल्या वृक्षांची तोड करण्यास नगरसेवक अमित गावडे यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. शहरातील हरित पट्ट्यांचे संरक्षण करण्यासाठी विकासकामांच्या आराखड्यांमध्ये आवश्यक बदल करावेत, अशी मागणी करत त्यांनी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्याकडे लेखी हरकत नोंदविली आहे.
महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने २० नोव्हेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ मधील कलम ८ (३) अंतर्गत जाहीर नोटीस प्रसिद्ध केली होती. या नोटिशीच्या अनुषंगाने गावडे यांनी प्रस्तावित वृक्षतोड आणि पुनर्रोपणाबाबत आक्षेप नोंदविले आहेत.
शहरात वाढते प्रदूषण, तापमानवाढ आणि पर्यावरणाचा बिघडता समतोल या समस्या गंभीर होत आहेत. अशा परिस्थितीत जुने आणि पूर्ण वाढ झालेले वृक्ष शहराची फुफ्फुसे आहेत. सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२६ या कालावधीत विविध विकास प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड आणि पुनर्रोपणाचे प्रस्ताव मांडण्यात आले आहेत. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास करणे शहराच्या भविष्यासाठी घातक ठरू शकते, असे गावडे यांनी हरकतीत नमूद केले आहे.
विकासकामांचे नियोजन करतानाच अस्तित्वातील वृक्ष वाचविण्यासाठी तांत्रिक पर्यायांचा अभ्यास करावा. प्रकल्पाच्या आराखड्यात किरकोळ बदल करून झाडे वाचविणे शक्य असल्यास सरसकट वृक्षतोडीला परवानगी देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.
शहरात यापूर्वी पुनर्रोपण करण्यात आलेल्या वृक्षांचे जगण्याचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचा दावा गावडे यांनी केला आहे. पुनर्रोपणानंतर आवश्यक तांत्रिक देखभाल आणि निगा राखली जात नसल्याने अनेक वृक्ष सुकून जातात. त्यामुळे पुनर्रोपणाचा पर्याय स्वीकारण्याऐवजी शक्य तितक्या वृक्षांचे मूळ ठिकाणीच संरक्षण करण्याला प्राधान्य द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रस्तावित वृक्षतोडीमध्ये बाधित होणाऱ्या प्रaत्येक वृक्षाची पर्यावरण तज्ज्ञ, स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत संयुक्त पाहणी करण्यात यावी. तसेच बाधित वृक्षांची संख्या, वय, प्रजाती आणि संबंधित विकास प्रकल्पाची आवश्यकता याबाबतचा सविस्तर तपशील सार्वजनिक करावा, अशी मागणीही नगरसेवक अमित गावडे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.