ऑनलाइन आर्थिक व्यवहारात ज्येष्ठ नागरिकाला घातला लाखो रुपयांना गंडा
पिंपरी, ता. 13 - गॅस कनेक्शनचे बिल भरायचे राहिलेले आहे, असे फोनवर सांगून एका इसमाने ऑनलाइन व्यवहारात गहुंजे येथील लोढा बेलमोडो टॉवरमधील ६७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक केली आहे. या प्रकरणी आरोपींवर शिरगाव पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. 12) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी राजेंद्र नरहरी कोठनिस (वय ६७, रा. लोढा बेलमोडो टॉवर, गहुंजे, ता. मावळ, जि. पुणे) यांना दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे नाव संदिप कुमार गुप्ता असे सांगून त्यांच्या मुंबईतील घराच्या गॅस कनेक्शनचे बिल प्रलंबित असल्याचे सांगितले.
यानंतर आरोपीने फिर्यादीच्या व्हॉट्सअॅपवर “महानगर गॅस” नावाची APK फाईल पाठवली. ती उघडून माहिती भरल्यानंतर फिर्यादीने बिल भरण्याचा प्रयत्न केला असता व्यवहार अयशस्वी झाला. मात्र काही वेळातच त्यांच्या बँकेच्या क्रेडिट कार्डमधून रुपये 1,99,128 इतकी रक्कम परस्पर वळती करण्यात आली, असे तक्रारीत नमूद आहे.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 318(2) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (क), 66 (ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तपास करत आहेत.