'पुणे ग्रँड टूर - २०२७' दुसऱ्या पर्वाच्या आयोजनासाठी नियोजन बैठक

'पुणे ग्रँड टूर - २०२७' दुसऱ्या पर्वाच्या आयोजनासाठी नियोजन बैठक

 'पुणे ग्रँड टूर - २०२७' दुसऱ्या पर्वाच्या आयोजनासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अध्यक्षतेखाली नियोजन बैठक 

पुणे, ता. १३ -  'पुणे ग्रँड टूर - २०२७' आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात आज, शुक्रवारी (ता. १२) विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक पार पडली. यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या ‘पुणे ग्रँड टूर’ सायकल स्पर्धेच्या यशस्वी आयोजनातून आपण अत्यंत कमी कालावधीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा उपक्रम उभा केला आहे. आता आगामी दुसऱ्या पर्वाच्या माध्यमातून या स्पर्धेची उंची, दर्जा, व्याप्ती आणि प्रभाव अधिक पुढे नेऊन नवा मापदंड निर्माण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, तयारीचा आढावा घेण्यासाठी नियामक परिषद स्थापन करण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बैठकीत दिले.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या, ''ग्रँड टूर २०२७ चे उद्दिष्ट केवळ मागील वर्षाची पुनरावृत्ती नसून त्यापेक्षा अधिक व्यापक आणि प्रभावी आयोजन करणं आहे. मागील वर्षी शहरापासून ग्रामीण भागापर्यंत या स्पर्धेचा आनंद सर्वांनी घेतला. मुख्यमंत्री महोदयांच्या पाठबळानं ही स्पर्धा यशस्वी झाली. या संकल्पनेचा पाया आदरणीय अजितदादांनी रचला आहे. पुणे हे जागतिक क्रीडा केंद्र बनावं, युवकांना सायकलिंगसाठी व्यासपीठ मिळावं आणि पुण्याचं आंतरराष्ट्रीय क्रीडा नकाशावर स्वतंत्र स्थान निर्माण व्हावे ही त्यांची दूरदृष्टी होती. सर्व विभाग, अधिकारी, कर्मचारी, स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा, स्वयंसेवक आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या समन्वयातून ही स्पर्धा अत्यंत यशस्वीरीत्या पार पडली. आगामी स्पर्धेमुळे पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू, किल्ले आणि पर्यटनस्थळे जागतिक पटलावर येऊन पर्यटनाला मोठी चालना मिळेल.''

''आगामी स्पर्धेसाठी राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था व सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या सहभागातून नियामक परिषद (गव्हर्निंग कौन्सिल) स्थापन करण्यात यावी. ही परिषद सर्वोच्च धोरणात्मक व देखरेख करणारी संस्था असेल आणि दरमहा बैठक घेऊन प्रगतीचा आढावा घेईल. त्याचबरोबर स्वतंत्र आयोजन समिती स्थापन करून प्रत्येक समिती, विभाग व अधिकाऱ्यांच्या भूमिका, जबाबदाऱ्या व अधिकार स्पष्टपणे निश्चित करावेत.'', असे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले. 

स्पर्धेसाठी शासनाकडून निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही; मात्र महानगरपालिका व इतर यंत्रणांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे, असं सूचित केलं.

गतवर्षीच्या यशस्वी आयोजनामुळे ‘युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल’नं स्पर्धेचा दर्जा २.२ वरून २.१ असा उन्नत केला असून यावर्षी ६ टप्प्यांची व सुमारे १०९९ कि.मी. लांबीची स्पर्धा होणार आहे, ही आनंदाची बाब आहे. सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करून ही स्पर्धा अधिक भव्य, सुरक्षित आणि जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त व्हावी, या मुद्द्यावर बैठकीत भर देण्यात आला.








Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories