''सरकार व प्रशासनातील अधिकारी पेपर फुटी प्रकरणात थेट गुंतलेले, सरकार त्यांना पाठीशी घालतेय ''
''सरकार व प्रशासनातील अधिकारी पेपर फुटी प्रकरणात थेट गुंतलेले, सरकार त्यांना पाठीशी घालतेय ''
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते हनुमंत पवार यांची टिका, पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसची पत्रकार परिषद
पिंपरी, ता. २ जुलै २०२६ - केंद्र आणि राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा क्रूर खेळ बंद करावा. देशपातळीवरील 'NEET'परीक्षा, महाराष्ट्रातील 'TET'परीक्षा, राजस्थानमधील पॅरामेडिकल परीक्षा, पुणे महापालिकेतील नोकर भरती या परीक्षांचे पेपर फुटले. अशा असंख्य परीक्षांचे पेपर या सरकारच्या काळात चक्क पैसे घेवून विकले जात आहेत. कोणावरही जबाबदारी निश्चित होत नाही, कोणत्याही मंत्र्यांवर, अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही. सरकार आणि प्रशासनातील अधिकारी या प्रकरणात थेट गुंतलेले असून सरकार त्यांना पाठीशी घालत आहे. अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते हनुमंत पवार यांनी केली.
देशात आणि राज्यात होत असलेल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी अत्यावश्य असणाऱ्या परीक्षांच्या पेपर फुटीच्या प्रकरणाबाबत पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसने बुधवारी (ता. १) पत्रकार परिषद आयोजित केली होती. या प्रसंगी काँग्रेसचे परदेश प्रवक्ते हनुमंत पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, प्रदेश काँग्रेसचे सचिव अशोक मोरे, माजी सचिव गौतम आरकडे, अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव स्वप्निल बनसोडे, छावा मराठा युवा महासंघाचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण कदम, कबीर मोहम्मद, राहुल शिंपले, सुरज कुलकर्णी, विल्यम साळवी, सदाशिव तळेकर, हिराचंद जाधव, लक्ष्मण म्हेत्रे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना हनुमंत पवार म्हणाले, ''लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडीत असलेल्या या विषयावर सरकारला जाब विचारण्यासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष, एनएसयूआय आणि युवक काँग्रेस महाराष्ट्रासह देशभर रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन निदर्शने करत आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, राज्यातील शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे राजीनामे घेवून 'NEET'आणि 'TET'परीक्षेच्या पेपर फुटीची न्यायालयीन चौकशी करून दोषींना तत्काळ गजाआड करण्याची काँग्रेस पक्षाची आग्रही मागणी आहे.''
''विधानसभेच्या मागील अधिवेशनात देवेंद्र फडणवीसांनी पेपर फुटीच्या विरोधात कडक कायदा केल्याचे भाषण दिले होते, तुम्ही केलेला कायदा सक्षम होता तर हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर 'TET'चा पेपर फुटला कसा ? कायदा कुचकामी आहे की प्रशासनातील अधिकारी भ्रष्ट आहेत की मंत्रालयातील मंत्री पेपर फुटीत सहभागी आहेत ? याची उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावी. सन २०२१ ला 'TET'पेपर फुटी झाली होती, शिक्षण खात्यातील, परीक्षा परिषदेतील अनेक वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी अटक करण्यात आली होती, या प्रकरणाचे पुढे काय झाले ? यावर ही आता मुख्यमंत्री बोलत नाहीत. या भाजपच्या लोकांनी पेपर फोडले, आमदार, खासदार फोडले, मंदिराची दानपेटी फोडली. यांना जनता यांची जागा नक्की दाखवेल.'', असे हनुमंत पवार म्हणाले.
काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले, "पेपर फुटतो, विश्वास तुटतो.....असा विश्वासघात सातत्याने होत आहे. सर्व स्तरातून अपयशी झालेले हे सरकार आता विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा व्यापार करण्यावर उठले आहे, विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रश्नपत्रिका सुद्धा विकण्याचे काम यांच्या सरकारच्या काळात होत आहे, ही बाब अतिशय गंभीर आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याला मोठा धोका निर्माण करणारी आहे. अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, याबाबत तत्काळ केंद्र आणि राज्यातील शिक्षण मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत अशी आमची ठाम मागणी आहे. विद्यार्थ्यांच्या झालेल्या शैक्षणिक वर्षाची नुकसान भरपाई कशी होणार ? याचे उत्तर या सरकारने द्यावे, या भ्रष्टाचाराच्या दृष्टचक्रात होरपळलेले विद्यार्थी, पालक, शिक्षक, कुटुंबीय या भाजप सरकारला कधीही माफ करणार नाहीत.''