पिंपरी-चिंचवड | २१ ऑक्टोबर २०२६ : प्रत्येक व्यक्तीचे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असते. आयुष्यात प्रथम ध्येय निश्चित करून योग्य नियोजन, सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाच्या जोरावर सकारात्मक प्रयत्न केल्यास यश मिळते, असे प्रतिपादन सिटी प्राईड स्कूलच्या प्राचार्य डॉ. कांचन देशपांडे यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई) मधील अंतर्गत तक्रार समितीच्या वतीने 'मी... माझा प्रवास, अनेक भूमिका आणि सुवर्णमध्य' या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी महिलांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील आव्हानांवर मार्गदर्शन केले.
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. क्षमा उपलेंचवार यांनी सांगितले की, अनेक महिला कुटुंबाची जबाबदारी सांभाळून नोकरी, उद्योग आणि व्यवसाय करतात. या प्रवासात त्यांना चिंता आणि ताणतणावाचा सामना करावा लागतो. त्यामुळे काम आणि वैयक्तिक आयुष्यात योग्य समतोल राखण्याबरोबरच आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
कायदा सल्लागार ॲड. परिक्रमा खोत यांनी अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. केवळ चर्चेतून समानता निर्माण होत नाही, तर आवश्यकतेनुसार संघर्ष करावा लागतो. सामाजिक बदलाची सुरुवात स्वतःच्या घरापासून झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
उद्योजिका सुजल शहा यांनी प्रत्येकाने स्वतःचा मार्ग निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. आयुष्यात सकारात्मकतेबरोबरच नकारात्मक परिस्थितीलाही सामोरे जावे लागते. त्यामुळे नोकरी आणि वैयक्तिक आयुष्यात समन्वय साधणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अंतर्गत तक्रार समितीच्या उपाध्यक्ष सहायक प्राध्यापिका वृषाली भालेराव यांनी महिलांना विविध जबाबदाऱ्या पार पाडताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले. या विषयांवर विचारमंथन करण्यासाठी महाविद्यालयाने खुले व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी नमूद केले.
या चर्चासत्राला पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, उपसंचालक निळकंठ चोपडे, अधिष्ठाता डॉ. शीतल भंडारी यांच्यासह प्राध्यापक आणि मान्यवर उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या संयोजनात डॉ. वृषाली भालेराव आणि डॉ. शिल्पा मोटेगावकर यांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन स्नेहा कल्याणकर यांनी केले, तर आभार डॉ. सोनल गोरे यांनी मानले.