पिंपरी-चिंचवड | २२ ऑक्टोबर २०२६ : दिवाळीनिमित्त घराची साफसफाई करताना वापरात नसलेल्या मात्र सुस्थितीत असलेल्या वस्तू कचऱ्यात फेकून देण्याऐवजी गरजूंपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने केले आहे. यासाठी शहरातील आठ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत आर.आर.आर. (रिड्यूस, रियुज, रिसायकल) केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
घरातील जुने कपडे, पुस्तके, खेळणी, भांडी, फर्निचर, चादरी, पडदे, शालेय साहित्य, चपला आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांसारख्या वस्तू अनेकदा निरुपयोगी समजून फेकल्या जातात. मात्र, या वस्तू चांगल्या स्थितीत असल्यास त्यांचा पुनर्वापर करून गरजू नागरिकांना मदत करता येऊ शकते.
महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे कचऱ्याचे प्रमाण कमी करणे, पर्यावरणाचे संवर्धन आणि सामाजिक बांधिलकी जपणे या उद्दिष्टांना चालना मिळणार आहे.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, स्वच्छ, सुंदर आणि हरित शहर घडविण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. दिवाळीच्या साफसफाईत जुन्या वस्तू फेकून न देता आर.आर.आर. केंद्रांमध्ये जमा केल्यास त्यांचा गरजू व्यक्तींना उपयोग होईल. वस्तूंचा पुनर्वापर ही पर्यावरणाप्रती जाणीव आणि सामाजिक जबाबदारी जपण्याची संधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनीही नागरिक आणि गृहसंकुलांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. जुन्या वस्तूंना नव्याने उपयोगात आणल्यास पर्यावरण रक्षणाबरोबरच गरजूंच्या जीवनात आनंद निर्माण करता येईल, असे त्यांनी सांगितले.
उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरातील सुस्थितीतील वस्तू आर.आर.आर. केंद्रांमध्ये जमा कराव्यात, असे आवाहन केले आहे.
शहरातील हद्दीत असणारी आर.आर.आर केंद्रे:
* कापसे उद्यान, मोरवाडी (प्रभाग १०); आकुर्डी भाजी मंडई (प्रभाग १४); संत तुकाराम महाराज उद्यान (प्रभाग १५); श्रीधरनगर उद्यान (प्रभाग १९).
* एसकेएफ कंपनीशेजारी, थेरगाव (प्रभाग १७); हेगडेवार पूल, दर्शननगरी (प्रभाग १८); धर्मराज चौक, रावेत (प्रभाग १६); ज्योतिबा उद्यान, काळेवाडी (प्रभाग २२).
* हेगडेवार क्रीडा संकुल, अजमेरा (प्रभाग ९); धावडे वस्ती, भोसरी (प्रभाग ६); संत सावता महाराज उद्यान, मोशी (प्रभाग २); संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, पिंपळे गुरव (प्रभाग ८).
* लिनियर उद्यान, कोकणे चौक (प्रभाग २८); ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले उद्यान, पिंपळे निलख (प्रभाग २६); तानाजी कलाटे उद्यान, वाकड (प्रभाग २५); प्रभाग कार्यालय क्रमांक २९.
* मोशी चौक (प्रभाग ३); दिघी जकात नाका (प्रभाग ४); राजमाता जिजाऊ उड्डाणपूल, भोसरी (प्रभाग ५ व ७).
* वृंदावन, चिखली (प्रभाग १); भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यान (प्रभाग ११); रूपीनगर पोलीस चौकी (प्रभाग १२); शनि मंदिर, सेक्टर २१ (प्रभाग १३).
* थेरगाव रुग्णालयाशेजारी, जगताप नगर (प्रभाग २३); मोरू बारणे उद्यान, थेरगाव (प्रभाग २४); पिंपरी गाव बसथांबा (प्रभाग २१); आरोग्य कोठी, रहाटणी गावठाण (प्रभाग २७).
* छत्रपती शिवाजी महाराज गोल मंडई, संत तुकाराम नगर (प्रभाग २०); सितांगण उद्यान (प्रभाग ३०); कै. काळुराम जगताप तलाव (प्रभाग ३१); जुनी सांगवी भाजी मंडई (प्रभाग ३२).
या केंद्रांमध्ये पुस्तके, वह्या, शालेय साहित्य, सुस्थितीतील कपडे, चादरी, पडदे, खेळणी, घरगुती साहित्य, भांडी, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि पुनर्वापर करता येण्याजोग्या इतर वस्तू जमा करता येणार आहेत.
वस्तू जमा करण्यासाठी संपर्क क्रमांक : ७०३०९०१९९३ / ९१६८६८४६७०
नागरिकांनी तसेच गृहनिर्माण संस्थांनी या क्रमांकांवर संपर्क साधून वस्तूंच्या संकलनासाठी सहकार्य करावे आणि 'स्वच्छ दिवाळी, हरित दिवाळी' उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.