पिंपरी | २७ नोव्हेंबर २०२६ : पिंपरीत एका कंपनीच्या नावाने बनावट इलेक्ट्रिकल साहित्य दुकानात विक्रीसाठी ठेवल्याची तक्रार पिंपरी पोलिसांकडे करण्यात आली आहे. याप्रकरणी एका दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.१० वाजता पिंपरी कॉलनीतील रिव्हर रोडवर, बाबा मार्केटशेजारी असलेल्या रेश्मा इलेक्ट्रिकल्स या दुकानात हा प्रकार आढळला. चेतन मोतीराम गनात्रा (वय ५०, रा. निगडी) यांनी पोलिसांकडे तक्रार केली.
तक्रारीनुसार, विनय इलेक्ट्रिकल सोल्युशन कंपनीच्या उत्पादनांची नक्कल करून, कंपनीच्या नावाशी साम्य असलेल्या नावाने तयार केलेले साहित्य दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. याप्रकरणी दुकानदार विनोद लक्ष्मणदास जेठवाणी (वय ५०, रा. पिंपरी) यांच्याविरुद्ध पिंपरी पोलिसांनी २६ नोव्हेंबरला गुन्हा दाखल केला.
भारतीय न्याय संहितेच्या कलम ३(५) तसेच प्रताधिकार अधिनियम, १९५७ च्या कलम ५१ आणि ६३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट १ चे पोलीस उपनिरीक्षक गावडे तपास करत आहेत.