पिंपरी-चिंचवड : भोसरीत टेम्पो पार्किंग करण्याच्या कारणावरून वादाचे रुपांतर मारहाणीत झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत स्क्रॅप व्यावसायिकासह तीनजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात तिघांसह एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी परिसरातील भगतवस्ती येथे 15 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. समीर जन्नत अली अन्सारी (वय २०, रा. घरकुल प्राधिकरण, चिखली) हे स्क्रॅप व्यवसाय करतात. 15 नोव्हेंबरच्या दिवशी ते आपला भाऊ अमीर अन्सारी याच्यासोबत अशोक लेलँड टेम्पो घेऊन भोसरीतील भगतवस्ती येथील हनुमान मंदिराजवळ असलेल्या राठोड यांच्या लेथ मशीन शॉपमध्ये लोखंडी भंगार खरेदी करण्यासाठी गेले होते.
यावेळी टेम्पो पार्क करण्यासाठी तेथील मोटारसायकल बाजूला घेण्याच्या कारणावरून आरोपींसोबत वाद झाला. या वादातून आरोपींनी मिळून समीर अन्सारी, त्यांचा भाऊ अमीर आणि वडील जन्नत अली अन्सारी यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
तसेच, आरोपींनी तक्रारदार आणि त्यांच्या भावाला लेथ मशीन शॉपमध्ये नेऊन तेथे असलेल्या लोखंडी पाईपने त्यांच्या पाठीवर मारहाण केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या घटनेत समीर आणि अमीर यांच्यासह त्यांच्या वडिलांनाही दुखापत झाली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी अनिस राजपूत (वय 22), रणजित राजपूत (वय 51), राजबहादूर राजपूत (वय 78) आणि एका अनोळखी व्यक्तीविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 109/2026 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 115(2), 352आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दगडगावकर करीत आहेत.