पिंपरी-चिंचवड आरटीओची धडक कारवाई ; नियमभंग करणाऱ्या हजारो चालकांकडून दंड वसूल

पिंपरी-चिंचवड आरटीओची धडक कारवाई ; नियमभंग करणाऱ्या हजारो चालकांकडून दंड वसूल

पिंपरी : पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाच्या अत्याधुनिक रडार यंत्रणा असलेल्या इंटरसेप्टर वाहनांद्वारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. गेल्या सात महिन्यांत वाहतूक नियमांचे उल्लंघन केलेल्या 10 हजारांहून अधिकांवर ही कारवाई करण्यात आली असून 89 कोटीहून अधिक रुपयांचा दंड वसूलण्यात आला आहे. कारवाई झालेल्या वाहनांमध्ये दुचाकींची संख्या अधिक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल ते ऑक्टोबर 2026 या सात महिन्यांत 10 हजार 713 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्यावर 89 कोटी 24 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. यामध्ये, सिग्नलचे उल्लंघन करणाऱ्या 194, हेल्मेट न वापरणाऱ्या 2,277, तर सीटबेल्ट न लावणाऱ्या 686, आणि वाहन चालवताना मोबाईचा वापर करणाऱ्या 380 जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. 

तसेच वैध विमा नसलेल्या 2,378 वाहनचालकांकडूनही दंड वसूलण्यात आला आहे. याशिवाय अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या तीन आणि रिफ्लेक्टर नसलेल्या 916 वाहनांवर आणि इतर प्रकारच्या वाहतूकीच्या नियमभंगांत 3,879 वाहनांचा समावेश आहे.

राज्य परिवहन विभागाने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर नियंत्रणासाठी 69 इंटरसेप्टर वाहनांची खरेदी केली आहे. या वाहनांमध्ये  बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक रडार यंत्रणेच्या वापरासाठी 200 मोटार वाहन निरीक्षक आणि सहायक मोटार वाहन निरीक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यातील 9 इंटरसेप्टर वाहने पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाच्या ताफ्यात दाखल झाली असून 20 अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.

ही इंटरसेप्टर वाहने ताफ्यात दाखल झाल्यानंतर आरटीओच्या वायूवेग पथकांकडून मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, पुणे-बंगळुरू आणि पुणे-नाशिक महामार्गासह शहरातील अपघातांचे हॉटस्पॉट ठरणाऱ्या मार्गांवर तपासणी केली जात आहे. या माध्यमातून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे.

इंटरसेप्टर वाहनांमध्ये लेझर तंत्रज्ञानावर आधारित स्पीडगन बसवण्यात आली आहे. वाहनांच्या छतावर किंवा मागील बाजूस असलेले रडारयुक्त कॅमेरे 300 मीटर ते 1.5 किलोमीटर अंतरावरून वेगाने जाणाऱ्या किंवा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांचे छायाचित्र आणि व्हिडिओ टिपू शकतात. यामध्ये ई-चलन यंत्रणेसह मद्यपी वाहनचालकांची तपासणी करण्यासाठी ब्रेथ ॲनालायझरची सुविधाही उपलब्ध आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories