पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांकडून आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश ; 7 जणांना अटक

पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांकडून आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश ; 7 जणांना अटक

पिंपरी-चिंचवड : दुबईतून भारतासह विविध देशांतील नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सिमकार्डचा पुरवठा करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी पर्दाफाश  केला आहे. या टोळीकडून भारतातून मोबाईल सिमकार्ड दुबईत पाठविण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली असून, दुबईत राहून सायबर गुन्हे चालवणाऱ्या मुख्य आरोपीला इंटरपोलच्या मदतीने भारतात आणण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात दररोज ऑनलाइन फसवणुकीच्या तक्रारी दाखल होत होत्या. या प्रकरणांच्या तपासादरम्यान या टोळीचे धागेदोरे समोर आले. सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात म्युल बँक खातेधारक तुषार अमराराम चौधरी (वय २९, रा. चिखली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान आदर्श संतोष वाघमारे (वय २७, रा. आकुर्डी) याचाही या प्रकरणातील सहभाग आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या दोघांच्या चौकशीत मुख्य आरोपी सुमंत ऊर्फ नानू रविंद्र दसरेचे (वय २६, रा. निगडी प्राधिकरण) नाव समोर आले.

सुमंत दसरे हा दुबईतून चीनमधील एका नागरिकाच्या मदतीने सायबर फसवणुकीचे प्रकार करीत होता. तो परदेशात राहून गुन्हेगारी कारवाया करीत असल्याचे निष्पन्न होताच त्याला भारतात आणण्यासाठी पोलिसांनी लुकआऊट सर्क्युलर (LOC) आणि इंटरपोलची मदत घेतली. अखेर त्याला भारतात आणण्यात आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी यांच्या पथकाने मुंबई विमानतळावर त्याला ताब्यात घेत अटक केली.

मुख्य आरोपी दसरेच्या चौकशीदरम्यान या रॅकेटचा पर्दाफाश झाला. चौकशीत दुबईतून चालविल्या जाणाऱ्या सायबर गुन्ह्यांसाठी भारतातून तब्बल १० ते १२ हजार मोबाईल सिमकार्ड पुरविण्यात आल्याचे समजले. मनिष अशोललाल वाधवा (वय ४४, रा. अंबरनाथ पूर्व) आणि महेश कन्हैयालाल चौइथरामानी (वय ६०, रा. कल्याण पश्चिम) हे दोघे या सिमकार्डच्या पुरवठ्यात सहभागी असल्याची माहिती मिळाली. यानंतर सायबर पोलिसांनी तातडीने तांत्रिक तपास करत या दोघांना मुंबईतून अटक केली.

या दोघांची चौकशी केली असता सुरज मुन्नालाल चिकवा (वय ३२, मूळ रा. बांदा, उत्तर प्रदेश) आणि राजा अशोक कुमार (वय ३१, मूळ रा. वैशाली, बिहार) यांची नावे तपासात निष्पन्न झाली. त्यानुसार पोलिसांनी या दोघांनाही अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज चिकवा आणि राजा कुमार हे मोबाईल सिमकार्ड कंपनीमध्ये विक्रीचे काम करीत होते. सिमकार्ड खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांच्या नावावर ते सिमकार्ड काढत. मात्र, सिमकार्ड ग्राहकांना देण्याऐवजी 'ओटीपी एक्सपायर झाला' किंवा 'सर्व्हर नसल्यामुळे सिमकार्ड ॲक्टिव्ह झाले नाही' अशी कारणे सांगून त्यांची दिशाभूल करुन त्यांचे सिमकार्ड अन्य आरोपींकडे दिली जात होती. या कामासाठी दोघांना आर्थिक मोबदला मिळत असल्याचे तपासात समोर आले आहे.

या सिमकार्डचा वापर सायबर गुन्हे करण्यासाठी विविध प्रकारे केला जात होता. फसवणुकीसाठी फोन कॉल करणे, बनावट ॲप्लिकेशन नोंदणी करणे, बँक खात्यांशी सिमकार्ड जोडून आर्थिक व्यवहार करणे आणि बनावट नावाने ई-मेल आयडी तयार करणे अशा कामांसाठी त्यांचा वापर होत होता. या माध्यमातून सायबर गुन्हेगार आपली खरी ओळख लपवून पोलिसांच्या कारवाईपासून दूर राहण्याचा प्रयत्न करीत होते.

मनिष वाधवा आणि महेश चौइथरामानी यांच्या पासपोर्टची तपासणी केली असता त्यांनी आतापर्यंत २५ ते ३० वेळा दुबईला भेट दिल्याचे तपासात आढळले. या टोळीने पुरविलेल्या सिमकार्डचा वापर अन्य किती सायबर गुन्ह्यांसाठी करण्यात आला आहे आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.

अटक केलेल्या आरोपींकडून मिळालेल्या सिमकार्डच्या डेटाचे तांत्रिक विश्लेषण सुरू असून, त्यातून इतर सायबर गुन्ह्यांशी असलेले संबंध तपासले जात आहेत.

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त (सायबर व आर्थिक गुन्हे) रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे आणि पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, सहायक पोलीस निरीक्षक वैभव पाटील, पोलीस उपनिरीक्षक रोहित डोळस, सागर पोगण, प्रकाश कातकाडे यांच्यासह पोलीस पथकाने ही कारवाई यशस्वी केली.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories