नसरापूर व चाकण येथील बालकांवरील अत्याचाराचा पुरोगामी संघटनांनी केला तीव्र निषेध ....... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी
नसरापूर व चाकण येथील बालकांवरील अत्याचाराचा पुरोगामी संघटनांनी केला तीव्र निषेध
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी
पिंपरी, ता. ४ - पुणे जिल्ह्यात घडलेल्या दोन अत्यंत धक्कादायक घटनांमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. एका बाजूला अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार करून निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे, तर दुसरीकडे चाकण परिसरात बालकावर अत्याचार करून खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या दोन्ही घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनांचा तीव्र निषेध करत आरोपींवर लवकरात लवकर कठोर कारवाईची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी पुरोगामी संघटनांनी केली आहे. भाजप सरकारचाही संघटनांनी तीव्र निषेध केला आहेत. त्यासाठी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये निदर्शने सोमवारी (ता.४) केली.
ज्येष्ठ समाजसेवक पुरोगामी चळवळीचे नेते मानव कांबळे म्हणाले, ''तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जयंतीनिमित्त आणि महाराष्ट्र दिनानिमित्त अशी घटना होणे हे आपल्या सर्वांसाठी लाजिरवाणे आहे. जोपर्यंत आपण आपल्या सर्वांच्या जबाबदाऱ्या जाणून या व्यवस्थेला प्रशासनाला धारेवर धरत नाही तोपर्यंत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मिटणार नाही आणि तोपर्यंत अशा घटना होत राहतील त्यामुळे याचे मूळ समजून त्या मुळावर घाव घालणं गरजेचे आहे असे कांबळे म्हणाले.''
संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष सतीश काळे यांनी दोन्ही घटनांचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले की, “राज्यात अशा प्रकारच्या अमानुष घटना सातत्याने घडत असताना सरकारकडून ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत. त्यामुळे नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास डळमळीत होत आहे. काळे यांनी राज्य सरकारवर थेट टीका करत या घटनांची नैतिक जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारावी आणि तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. “राज्यातील महिला व बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. केवळ आश्वासने देऊन चालणार नाही,तर प्रत्यक्षात कडक कायदेशीर कारवाई आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले, ''घडलेल्या घटना अत्यंत दुर्दैवी आहे या राज्यात महाराष्ट्र दिनी अशा घटना होणे अत्यंत क्लेशशदायक आहे. राज्याला पूर्ण वेळ गृहमंत्री पाहिजे आणि पोस्को न्यायालयांची अधिक निर्मिती व्हावी.'' भाजप सरकार नाकर्ते असल्य़ाचा आरोप बनसोडे यांनी केला.
आंदोलनात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पुरोगामी चळवळीचे नेते मानव कांबळे, प्रदेश काँग्रेसचे सचिव अशोक मोरे, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती विष्णुपंत नेवाळे, गिरिजा कुदळे, अभिमन्यू दहीतुले, प्रदेश युवक काँग्रेसचे उमेश खंदारे, सत्यजित बिरादर, दक्षिण भारताचे मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष प्रकाश जाधव, कल्पना गीते,आबासाहेब ढवळे, वसंत पाटील,अशोक सातपुते अनिल कारंजेकर, दिलीप कैतके, संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रवीण कदम,जिजाऊ ब्रिगेड सुलभा यादव, मोनिका भोसले, कौशल्या जाधव, शितल मोरे सोनिया दिलपाक, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष शहाबुद्दीन शेख, ओबीसी महासंघाचे आनंदा दादा कुदळे सोमनाथ शेळके, हिराचंद जाधव, विजय ओव्हाळ, राजन नायर, बाबा गायसमुद्रे, जितेंद्र छाबडा, सार्थक बाराथे, मयूर रोकडे, पांडुरंग जगताप, भास्कर नारखेडे, राजेंद्र काळभोर, रफिक कुरेशी आदी पदाधिकारी आणि अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.