चाकण | ३० सप्टेंबर २०२६ : घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक वापराच्या गॅस टाकीत धोकादायक पद्धतीने गॅस भरताना दोघांवर चाकण उत्तर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत गॅसच्या टाक्यांसह नोझल पाइप आणि इतर साहित्य असा एकूण १० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अंमलदार बाळू मराडे (वय ४०) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी रवी किसन माडेकर (रा. आंबेठाण, ता. खेड, जि. पुणे) आणि एका विधिसंघर्षित बालकाविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
३० सप्टेंबर रोजी दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास आंबेठाण गावातील भाड्याच्या खोलीसमोरील मोकळ्या जागेत हा प्रकार सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
फिर्यादीनुसार, आरोपी घरगुती वापराच्या गॅस टाकीमधून लाल रंगाच्या लहान टाकीत काळ्या रंगाच्या नोझल पाइपच्या साहाय्याने गॅस भरत होते. स्वतःच्या फायद्यासाठी हा प्रकार सुरू असताना ज्वलनशील गॅसची हाताळणी निष्काळजीपणे करून लोकांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने गॅस रिफिलिंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या कारवाईत गॅस टाक्यांसह गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य ताब्यात घेण्यात आले. या साहित्याची एकूण किंमत १० हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे.
याप्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच जीवनावश्यक वस्तू कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.