हिंजवडी | ३० सप्टेंबर २०२६ : इन्स्टाग्रामवर साडीची जाहिरात पाहून ऑनलाइन ऑर्डर करणाऱ्या २७ वर्षीय तरुणीची १ लाख ११ हजार २०९ रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी एका २७ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. २९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत हा प्रकार ऑनलाइन माध्यमातून घडला.
फिर्यादी इन्स्टाग्राम पाहत असताना त्यांना manish_saree किंवा @manish_saree_9 या आयडीवर एक रील दिसली. त्यामध्ये मनीष मॅन्युफॅक्चर या कपड्याच्या दुकानाची रील होती. त्यातील एक साडी आवडल्याने फिर्यादीने ती खरेदी करण्यासाठी चौकशी केली.
त्यानंतर संबंधित व्यक्तीने व्हॉट्सॲप मोबाइल क्रमांकावरून संपर्क साधत साडीचे पैसे भरण्यास सांगितले. फिर्यादीने सुरुवातीला १,११,२०९ रुपये पाठवले. त्यानंतर जीएसटी भरण्याच्या नावाखाली १,६७६ रुपये पाठवण्यास सांगण्यात आले.
यानंतर विविध कारणे सांगून आणखी पैसे पाठवण्यास सांगण्यात आले. भरलेली रक्कम परत मिळेल, असे सांगून फिर्यादीकडून वारंवार पैसे घेण्यात आले. अशा प्रकारे फिर्यादीकडून एकूण १,११,२०९ रुपये घेऊन आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.