निगडी | २९ सप्टेंबर २०२६ : पत्नीच्या परपुरुषासोबत असलेल्या फोटोबाबत विचारणा करून त्याची माहिती न सांगितल्याने पत्नीला वकिलामार्फत कायदेशीर नोटीस पाठवल्याच्या रागातून फिर्यादी आणि त्यांच्या भावाला मारहाण केल्याची घटना निगडीतील यमुनानगर परिसरात घडली. या प्रकरणी एका पुरुषासह महिलेविरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल विलास करजखेडे (वय ३७, रा. हांडेवाडी रोड, हडपसर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी श्रीकांत सनमाने (रा. कात्रज, पुणे) आणि एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, २९ सप्टेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांचा भाऊ विनोद करजखेडे हे निगडीतील यमुनानगर येथील घरी होते. आरोपी दोघे तेथे आले. फिर्यादीच्या पत्नीचे परपुरुषासोबत असलेल्या फोटोबाबत फिर्यादीने विचारणा केली होती. त्याबाबत माहिती सांगत नसल्याने फिर्यादीने तिला वकिलामार्फत कायदेशीर नोटीस पाठवली होती. याचा राग आरोपींच्या मनात असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याच कारणावरून आरोपींनी फिर्यादी आणि त्यांचा भाऊ विनोद करजखेडे या दोघांना हाताने मारहाण करून जोराने लाथा मारल्या. त्यानंतर आरोपी क्रमांक एकाने फिर्यादीच्या भावाच्या कमरेजवळ आणि डाव्या पायाच्या गुडघ्यावर मारून मुका मार दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
तसेच महिला आरोपीने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.