पिंपरी | १ ऑक्टोबर २०२६ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने २ ते ८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘लोकशाही बचाव सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. लोकशाही व्यवस्था, संविधानिक मूल्ये आणि मतदारांच्या अधिकारांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे शहर काँग्रेसने सांगितले आहे.
काँग्रेसने दिलेल्या माहितीनुसार, या सप्ताहात निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, मतदार यादीतील बदल आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत पक्षाकडून उपस्थित करण्यात येणाऱ्या मुद्द्यांवर नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे.
सप्ताहांतर्गत समविचारी पक्षांसोबत जिल्हास्तरीय आणि ब्लॉकस्तरीय बैठका, पत्रकार परिषद, ‘वोट बचाव–देश बचाव’ मार्च, पदयात्रा आणि जनसंवाद कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. काँग्रेस कार्यकर्ते पक्षाच्या “वोट चोरो–कुर्सी छोडो” या घोषणेसह मतदारांच्या हक्कांबाबत नागरिकांशी संवाद साधणार असल्याचे पक्षाने म्हटले आहे.
पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी महात्मा गांधींच्या सत्य, अहिंसा, लोकशाही आणि संविधानिक मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून हा सप्ताह आयोजित करण्यात येत असल्याचे सांगितले.
“लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि त्यांच्या अधिकारांबाबत संवाद साधणे हा ‘लोकशाही बचाव सप्ताहा’चा प्रमुख उद्देश आहे,” असे बनसोडे यांनी म्हटले आहे.
या उपक्रमांमध्ये काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समविचारी पक्षांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शहर काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.