मावळात मालमत्तेसाठी बनावट बक्षीसपत्र; चौघांविरोधात गुन्हा

मावळात मालमत्तेसाठी बनावट बक्षीसपत्र; चौघांविरोधात गुन्हा

मावळ | ३० सप्टेंबर २०२६ : पतीच्या आजारपणाचा आणि त्यांच्या असमर्थ शारीरिक स्थितीचा फायदा घेऊन त्यांच्या नावावरील मालमत्ता हडपण्याच्या उद्देशाने जबरदस्तीने डिस्चार्ज करून नेल्याचा तसेच बनावट बक्षीसपत्र तयार करून मालमत्ता नावावर करून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका ४० वर्षीय महिला पोलीस हवालदाराने फिर्याद दिली असून चौघांविरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी नितीन बाबुराव दळवी  (वय ५५, रा. लोणावळा), संकेत जयवंत खाणेकर  (वय ३०, रा. जांभूळ, ता. मावळ), संतोष शंकर गुडपाळे  (वय ५२, रा. खोपोली ) आणि ४५ वर्षीय एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, १७ एप्रिल २०२६ रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास पवना हॉस्पिटल, सोमाटणे फाटा येथे हा प्रकार घडला. आरोपी क्रमांक एक आणि दोन यांनी संगनमत करून फिर्यादीच्या पतीच्या आजारपणाचा आणि त्यांच्या असमर्थ शारीरिक स्थितीचा फायदा घेत त्यांच्या नावावरील मालमत्ता हडपण्याचा उद्देश मनात धरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

फिर्यादीच्या पतीला पवना हॉस्पिटलमधून जबरदस्तीने डिस्चार्ज करून नेल्यानंतर त्यांच्या नावावरील मौजे कोथुर्णे येथील गट क्रमांक 191/1 आणि 191/3 या मालमत्तेबाबत बक्षीसपत्र तयार करण्यात आले. त्याची नोंदणी वडगाव मावळ येथील दुय्यम निबंधक कार्यालयात करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

संबंधित बक्षीसपत्र पतीने स्वतंत्र इच्छेने केले नसल्याचे माहिती असतानाही आरोपींनी दबाव आणि भीती दाखवून मालमत्ता आरोपी क्रमांक एकाला स्वेच्छेने बक्षीस म्हणून देण्याचा निर्णय घेतल्याचे भासवल्याचा आरोप आहे. तसेच साक्षीदारांनी या दस्तऐवजावर स्वेच्छेने सह्या केल्याचे दाखवून फिर्यादी आणि त्यांच्या मुलीची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories