वाकड | ३० सप्टेंबर २०२६ : क्रिप्टो करन्सीमध्ये पैसे गुंतवून दुप्पट परतावा मिळवून देण्याचे आश्वासन देत एका २३ वर्षीय तरुणासह त्याच्या परिचितांची एकूण 8 लाख 15 हजार 906 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी एका २३ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार एप्रिल २०२६ ते २८ मे २०२६ या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी सुनील राठोड (वय ३७) आणि ३२ वर्षीय एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही मुळशी तालुक्यातील नेरे परिसरातील रहिवासी असल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे.
फिर्यादीनुसार, आरोपींनी फिर्यादीला क्रिप्टो करन्सीमध्ये पैसे गुंतवण्यास सांगून त्याचे दुप्पट पैसे मिळतील, असे आश्वासन दिले. त्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने विविध वेळेत एकूण 2 लाख 73 हजार 482 रुपये गुंतवले.
तसेच फिर्यादीच्या परिचयातील भागवत तुळशीराम घोडके व अभिषेक भागवत घोडके यांनीही आरोपींच्या सांगण्यावरून एकूण 5 लाख 42 हजार 424 रुपये गुंतवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अशा प्रकारे एकूण 8 लाख 15 हजार 906 रुपये ऑनलाइन स्वरूपात विविध बँक खात्यांवर आणि स्कॅनरद्वारे स्वीकारून आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि आयटी ॲक्टमधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.