पिंपरी | ३० सप्टेंबर २०२६ : पिंपरी मार्केटमधून सामान घेऊन दुचाकीवरून परत जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी एका ४३ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. अपघात ३ जून २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पिंपरी ओव्हर ब्रिजवर घडला.
या प्रकरणी अमोल प्रल्हाद उमाळे (वय ३६, रा. इंदिरानगर, चिंचवड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, आरोपी अमोल उमाळे आणि फिर्यादीचे मयत नातेवाईक अनिल पांडुरंग डांगे (वय ५५) हे आरोपीच्या मोटारसायकल क्रमांक MH-14-DE-6874 वरून पिंपरी मार्केट येथे सामान घेण्यासाठी गेले होते. सामान घेऊन परत येत असताना अमोल उमाळे याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगयीने आणि अविचाराने दुचाकी चालवली. त्यामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटून ती रस्त्याच्या दुभाजकाला धडकली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
या अपघातात अनिल डांगे हे गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तसेच अपघातात मोटारसायकलचेही नुकसान झाले.
या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.