पिंपरी-चिंचवडमध्ये ड्रग्जविरोधात पोलिसांची कारवाई; दोन तरुणांना अटक

पिंपरी-चिंचवडमध्ये ड्रग्जविरोधात पोलिसांची कारवाई; दोन तरुणांना अटक

शहर आणि परिसरात अंमली पदार्थांची विक्री तसेच तस्करी रोखण्यासाठी पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर थेरगाव परिसरात एमडी सदृश्य अंमली पदार्थ बाळगणाऱ्या दोन तरुणांना काळेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १०.२९ ग्रॅम वजनाची फिकट पांढऱ्या रंगाची पावडर आणि मोबाईल फोन असा एकूण 1 लाख 45 हजार 290 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 4 नोव्हेंबर रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास थेरगाव गावठाण ते थेरगाव स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. या परिसरात दोन तरुण अंमली पदार्थ बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन तपासणी केली. यावेळी दोन तरुणांकडे एमडी सदृश्य अंमली पदार्थ आढळून आला.

प्रणव सुधाकर गायकवाड (वय 20, रा. पवनानगर) आणि अंश अमित चव्हाण (वय 19, रा. शिवराजनगर) अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. आरोपींकडे विक्रीच्या उद्देशाने अनधिकृतपणे एमडी सदृश्य अंमली पदार्थ असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 10.29 ग्रॅम वजनाची फिकट पांढऱ्या रंगाची पावडर आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 1 लाख 45 हजार 290 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी पोलीस हवालदार अतित रफिक शेख यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 619/2026 अन्वये एनडीपीएस कायद्याच्या कलम 8(क), 22(ब) आणि 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गुरव करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories