पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर किवळे परिसरात भीषण अपघाताची घटना घडली आहे. हायवा गाडीच्या चालकाने भरधाव वेगात वाहन चालवल्याने एकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात हायवा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 नोव्हेंबर रोजी पहाटे 4च्या सुमारास पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवरील किवळे परिसरात ही घटना घडली. संजय शाहुराज शिंदे (वय ४८, रा. सिंहगड रोड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, हायवा गाडीचा चालक अत्यंत निष्काळजीपणे आणि भरधाव वेगात वाहन चालवत होता.
याच मार्गावरुन संजय शिंदे आपला मित्र सतीश हिंदुराव शिंदे (रा. खोपोली) यांच्यासोबत पुण्याच्या दिशेने येत होते. यावेळी हायवा गाडी चालकाने भरधाव बेदरकारपणे वाहन चालवून त्यांना जोरदार धडक दिली.
संजय शिंदे या धडकेत त्यांना गंभीर दुखापत झाले. तर त्यांचा मित्र सतीश हिंदुराव शिंदे यांचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. हायवा चालकाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे.
देहूरोड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 106(1), 125(अ), 125(ब), 324(4) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम 184, 199 आणि197 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल वाघमोडे करीत आहेत.