राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त शहर काँग्रेसचा 'भारत जोडो संवाद' उपक्रम
पिंपरी, ता. १९ - कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीकडून 'भारत जोडो संवाद' हा जागृतीपर उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत नागरिकांशी संवाद साधत त्यांना भारतीय संविधान, लोकशाही मूल्ये, धर्मनिरपेक्षता, नागरिकांचे अधिकार, कर्तव्य, जबाबदाऱ्या बंधुभाव, संसदीय लोकशाही याबाबत संविधानाच्या अभ्यासकांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.
याबाबत माहिती देताना उपक्रमाचे आयोजक आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी सांगितले, "देशाच्या राजकारणात जनतेची बाजू मांडत राहुल गांधी खऱ्या अर्थाने आज जनन्यायाचे भारत योद्धा ठरले आहेत, देशाची लोकशाही टिकावी, संविधान अबाधित रहावे, यासाठी त्यांनी संपूर्ण देशात लढा उभारला आहे. त्यांचा वाढदिवस देखील त्याच पद्धतीने व्हावा त्यांच्याच कार्याला पुढे नेणारा जनहिताचा असावा या भावनेने, भारत जोडो संवाद या उपक्रमाचे आयोजन केले आहे, या अंतर्गत विद्यार्थी, युवक, महिला, जेष्ठ नागरिक, मजूर, शेतकरी, कामगार, व्यापारी, सेवानिवृत्त, उद्योजक अशा विविध घटकांशी संवाद साधला जाणार आहे, याद्वारे लोकशाही मूल्य, नागरी कर्तव्य, बंधुभाव, सर्व धर्म समभाव, अधिक प्रमाणात जागृत केला जाणार आहे."
या उपक्रमाची सुरुवात राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दिनांक १९ जूनपासून सायंकाळी ४ वाजता शहरात थेरगाव येथील माध्यमिक विद्यालय आणि पिंपळे गुरव येथील माध्यमिक विद्यालय येथे विद्यार्थी संवादापासून करण्यात येत आहे. या सुरुवातीच्या संवादासाठी प्रसिद्ध भाषण, संवाद प्रशिक्षक, बालाजी जाधव आणि इंडी जर्नलचे प्रथमेश पाटील उपस्थित राहणार आहेत.