पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय रंगमहोत्सवाचे आयोजन ; दिग्गज रंगकर्मींची मांदियाळी

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय रंगमहोत्सवाचे आयोजन ; दिग्गज रंगकर्मींची मांदियाळी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, थिएटर वर्कशॉप कंपनी आणि पैस कल्चरल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रायोगिक रंगभूमी आणि विविध कलाप्रकारांचा संगम असलेला ‘रंगानुभूती : पूर्वरंग ते उत्तररंग’ हा राष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 21 ते 24 नोव्हेंबर 2026 च्या कालवधीत निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवात देशभरातील पाच नाट्यप्रयोग, दिग्गज रंगकर्मींची पाच अभ्यासवर्ग, काव्यात्मक कार्यक्रम, परिसंवाद, कार्यशाळा तसेच चित्र-शिल्प प्रदर्शन असे विविध कार्यक्रम रसिकांना अनुभवता येणार आहेत. अशी माहिती महापौर रवी लांडगे यांनी पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

राष्ट्रीय स्तरावरील या महोत्सवात भारतभरातील विविध संस्थांच्या माध्यमातून अभिनव पद्धतीने सादर होणाऱ्या प्रयोगकलांचा समावेश करण्यात आला आहे. कलकत्ता, केरळ, आसाम, ओरिसा, दिल्ली, मुंबई आणि पुण्यातील निमंत्रित रंगकर्मी व अभ्यासक महोत्सवात सहभागी होणार आहेत. पूर्वरंगात नांदीसह नाट्यगीतांचा सांगीतिक कार्यक्रम होणार असून, उत्तररंगात राष्ट्रीय नाट्य महोत्सवांमध्ये स्थान मिळवलेल्या पाच नाट्यप्रयोगांचे सादरीकरण होणार आहे.

यंदाचा ‘रंगानुभूती सन्मान' कणकवली येथील ज्येष्ठ रंगकर्मी वामन पंडित यांना प्रदान करण्यात येणार आहे. महोत्सवाच्या निमित्ताने शिल्पकला आणि चित्रकलेसह पिंपरी-चिंचवड शहराचा सांस्कृतिक वारसा मांडणारे विशेष प्रदर्शनही आयोजित करण्यात येणार आहे. स्थानिक विद्यालये, महाविद्यालये तसेच सांस्कृतिक आणि सामाजिक संस्थांच्या सहभागातून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

महोत्सवात राष्ट्रीय नाट्य विद्यालय, दिल्ली (एनएसडी)चे संचालक चित्तरंजन त्रिपाठी, ज्येष्ठ नाटककार जब्बार पटेल, ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर, भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेचे (FTII) माजी विभागप्रमुख प्रा. समर नखाते आणि पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राचे विभागप्रमुख डॉ. प्रवीण भोळे उपस्थित राहणार आहेत.

याशिवाय ‘रंगमंथन’ परिसंवादात ज्येष्ठ रंगकर्मी प्रदीप वेलणकर आणि शाम पेठकर यांच्याशी संवाद साधला जाणार आहे. महोत्सवासाठी ज्येष्ठ नाटककार जब्बार पटेल, सतीश आळेकर आणि भारतीय चित्रपट आणि दुरदर्शन संस्थेचे (FTII) माजी विभागप्रमुख प्रा. समर नखाते यांचे मार्गदर्शन व सल्लागार सहकार्य लाभले आहे. डॉ. प्रवीण भोळे यांच्या सहकार्याने महोत्सवाची रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे.

या महोत्सवात नाट्यप्रयोगांसोबतच पाच अभ्यासवर्ग, काव्यात्मक कार्यक्रम, परिसंवाद, कार्यशाळा आणि चित्र-शिल्प प्रदर्शन अशा विविध कलाविष्कारांचा अनुभव घेता येणार आहे. कवी नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेच्या सहकार्याने विशेष काव्यात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा संपूर्ण महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असून, शहरातील नागरिक आणि नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

पत्रकार परिषदेला उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, उपायुक्त अण्णा बोदडे, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच थिएटर वर्कशॉप कंपनी व पैस कल्चरल फाऊंडेशनचे संचालक प्रभाकर पवार उपस्थित होते.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories