शिरगाव साईबाबा ट्रस्टमध्ये कोट्यवधींच्या गैरव्यवहाराचा आरोप ; आंदोलनाचा इशारा

शिरगाव साईबाबा ट्रस्टमध्ये कोट्यवधींच्या गैरव्यवहाराचा आरोप ; आंदोलनाचा इशारा

पिंपरी : मावळ तालुक्यातील श्री साईबाबा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट व संलग्न श्री साईबाबा अन्नछत्र मंडळ यांच्या आर्थिक व्यवहारांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप ट्रस्टचे संस्थापक व तहहयात विश्वस्त उस्मान दगडू शेख यांनी केला आहे. या प्रकरणी दानपेटीतील देणगी रकमेची अफरातफर, बनावट ठराव व दस्त ऐवजांमध्ये फेरफार आणि आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत संबंधित विश्वस्त आणि अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे.

या संदर्भात गुरूवारी (19 नोव्हेंबर) पिंपरीत पत्रकार आयोजित करण्यात आली होती. यावेळी ट्रस्टचे संस्थापक व तहयात विश्वस्त उस्मान दगडू शेख, तहयात विश्वस्त समीर शेख, ॲड. अनघा कुलकर्णी, अक्षय धावरे, रामभाऊ गोपाळे व शिरगावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत बोलताना तहयात विश्वस्त समीर शेख यांनी सांगितले की, श्री साईबाबा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टची नोंदणी ९ सप्टेंबर २००२ रोजी सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नोंदणी कार्यालय, पुणे येथे करण्यात आली असून, ट्रस्टचा नोंदणी क्रमांक इ/३६७४/पुणे असा आहे. ट्रस्टमध्ये एकूण सात विश्वस्त असून तत्कालीन आमदार प्रकाश देवळे हे अध्यक्ष होते. त्यांच्यासह प्रसाद दत्तात्रय पाटील, प्रमोद माणिक शेठ दुगड, धोंडीराम चव्हाण, उस्मान शेख, दिगंबर शेठ बाळासाहेब भेगडे आणि प्रा. नारायण  फरांदे हे विश्वस्त होते.

प्रकाश देवळे यांचे २४ सप्टेंबर २०२५ रोजी निधन झाल्यानंतर रवी जाधव व उमेश कविटकर यांना विश्वस्त म्हणून संस्थेत समाविष्ट करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर या दोघांनी इतर विश्वस्तांना विश्वासात न घेता आर्थिक व्यवहारांमध्ये अफरातफरी केल्याचा आरोप समीर शेख यांनी केला आहे. यामुळे मंदिरात भेट देण्यास येणाऱ्या साई भक्तांचा अनादर झाल्याचे त्यांनी म्हटले.

शिरगाव येथील श्री साई मंदिरात पुणे मुंबईसह देश परदेशातून साईभक्त दर्शनासाठी येतात. भाविकांकडून श्रद्धेने रोख रक्कम, सोने, चांदी, हिरे आधी मौल्यवान दागिने दान केले जातात. दरमहा लाखो रुपयांची रक्कम जमा होते. मात्र, यातील ठराविकच रक्कम संस्थेच्या बँक खात्यात जमा केली जात असून उर्वरित रक्कमेचा वैयक्तिक कामासाठी बेकायदेशीररित्या वापर केला जात असल्याचा संशय समीर शेख यांनी व्यक्त केला आहे. अनेक वेळा दानपेटीतून रोख रक्कम चोरल्याचाही आरोप समीर शेख यांनी केला. 

बँकेत भरलेल्या रकमेचा आणि दानपेटीतून मिळालेल्या रकमेचा ताळमेळ जुळत नसल्याचे समीर शेख यांनी सांगितले. या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर दानपेटीतील  नोटांच्या तपशिलासंदर्भात बोगस कादपत्रे तयार करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. यामुळे संबंधित कागदपत्रांवरील हस्ताक्षरांची तपासणी करण्याची मागणी संस्थेच्या विश्वस्तांकडून करण्यात आली आहे.

याशिवाय परिसरातील दुकानदारांकडून मिळणाऱ्या भाड्याचा देखील तपशील जुळत नसल्याचे समीर शेख यांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकरणी स्थानिक पोलिसांत आणि धर्मादाय आयुक्त पुणे कार्यालयात लेखी तक्रार करण्यात आली आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जात असून पोलीस प्रशासनातील काही अधिकारी आणि धर्मादाय आयुक्त कार्यालयातील काही अधिकारी संबंधित विश्वस्तांना मदत करत असल्याचा संशय समीर शेख यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, मंदिरात जमा होणाऱ्या निधीचा उपयोग स्थानिक गावाच्या विकास कामासाठी वापर करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच अन्नछत्रातील दूषित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता नदीत सोडले जात असल्यामुळे प्रदूषण होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये तातडीने गुन्हा दाखल करून फौजदारी कारवाई करण्याची मागणी विश्वस्तांनी केली आहे. अन्यथा 15 डिसेंबरपासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थांसह आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा समीर शेख यांनी दिला आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories