सकारात्मकेच्या प्रकाशासाठी आज सामुदायिक निर्भयतेची गरज - गझलकार म.भा.चव्हाण
पिंपरी, ता. २३ - ''प्रत्येकजण सूर्य होऊ शकत नाही. पण, काजवा होऊन स्वयंप्रकाशाने प्रत्येकजण आपला परिघ बदलू शकतो आणि आपला परिघ बदलतानाच समाजातही नकारात्मक गोष्टी दूर सारण्यासाठी एकजूट व्हायला हवी. सकारात्मकेच्या प्रकाशासाठी आज सामुदायिक निर्भयतेची गरज आहे." असे मत ज्येष्ठ गझलकार म. भा. चव्हाण यांनी व्यक्त केले.
पिंपळे गुरव येथे काव्यात्मा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. त्यावेळी चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. लेखक श्रीकांत चौगुले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या इरान्ना निंबाळ (काव्य साधना जीवन गौरव पुरस्कार), निलेश शेंबेकर (गझलकार प्रकाश बनसोडे सन्मान पुरस्कार), युवा कवी उमेंद्र बिसेन (काव्य प्रतिभा सन्मान पुरस्कार), संभाजी रणसिंग (शब्दप्रभू काव्य पुरस्कार), संदिप तापकीर (काव्यात्मा सांस्कृतिक कार्य गौरव पुरस्कार),संजय मलवाड (काव्यात्मा आदर्श शिक्षक पुरस्कार), संतोष खवळे (काव्यात्मा युवा उद्योगरत्न पुरस्कार), राजू जाधव ( श्रमप्रतिष्ठा पुरस्कार) या म.भा.चव्हाण यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
लेखक श्रीकांत चौगुले अध्यक्षीय भाषणात म्हणाले, ''सामाजिक मूल्यांची जपणूक करणारे साहित्य निर्माण झाले पाहिजे आणि असे साहित्य टिकावू असते.'' वृक्षमित्र अरुण पवार ,व्यंकटराव वाघमोडे, लहू काळे, संजय साळुंखे, लहू काळेंनी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कवी संमेलनात प्रमोद जगताप ,प्रा.माया मुळे,राधाताई वाघमारे,सुहास घूमरे, शोभाताई जोशी,अशोक वाघमारे, रशिद अत्तार,महेमूदा शेख , प्रकाश गायकवाड, योगिता कोठेकर,प्रतिमा काळे ,अनिल नाटेकर, धनंजय इंगळे, विजय जाधव यांच्यासह ३५ कवींनी कविता सादर केल्या. कवी संमेलनाचे निवेदन दादाभाऊ ओव्हाळ यांनी व आभारप्रदर्शन कवी दत्तू ठोकळे यांनी केले.
पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रस्ताविक संस्थापक-अध्यक्ष आत्माराम हारे यांनी केले. प्रतिमा काळे यांनी सूत्रसंचालन केले. कवी संमेलनाचे निवेदन दादाभाऊ ओव्हाळ यांनी व आभारप्रदर्शन कवी दत्तू ठोकळे यांनी केले.