पावसाळी आपत्तीचा सामना करण्यासाठी 'पीएमआरडीए'चे आपत्ती प्रतिसाद पथक (पीडीआरएफ) व अग्निशमन दल सज्ज
पावसाळी आपत्तीचा सामना करण्यासाठी 'पीएमआरडीए'चे आपत्ती प्रतिसाद पथक (पीडीआरएफ) व अग्निशमन दल सज्ज
तब्बल ३०० हून अधिक अग्निदुर्घटनांमध्ये तातडीने धाव; १८९ बचावकार्ये यशस्वी
पिंपरी, ता. १ जुलै २०२६ - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) क्षेत्रातील वाढते नागरीकरण, डोंगराळ भाग, घाट परिसर, धरण क्षेत्र आणि नद्या-नाल्यांची भौगोलिक विविधता लक्षात घेऊन 'पीएमआरडीए'चे पुणे महानगर आपत्ती प्रतिसाद पथक (पीडीआरएफ) व अग्निशमन दल हे पावसाळी आपत्तीचा सामना करण्यासाठी पूर्णतः सज्ज झाले आहे. मान्सूनच्या काळात अतिवृष्टीमुळे उद्भवू शकणारी पूरपरिस्थिती, भूस्खलन, दरडी कोसळणे, झाडे पडणे आणि रस्ते खचणे यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी अग्निशमन सेवा आणि पीडीआरएफ पथकाने आपली तयारी पूर्ण केली आहे. मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांच्या थेट मार्गदर्शनाखाली हे पथक २४ तास संपूर्ण पुणे महानगर क्षेत्रासाठी धावून जाण्यास सज्ज आहे.
'पीएमआरडीए'ने सविस्तर माहिती देताना सांगितले आहे की, 'पीएमआरडीए'ने स्थापन केलेल्या अग्निशमन दल व 'पीडीआरएफ' पथकाने अत्यंत कमी कालावधीत पूर नियंत्रण आणि बचावकार्यामध्ये आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. या पथकाने आतापर्यंत पुणे महानगर हद्दीत तब्बल ३०० हून अधिक अग्निदुर्घटनांमध्ये तातडीने धाव घेत अग्निशमन केले असून, १८९ यशस्वी बचावकार्ये पार पाडली आहेत. पुण्यात झालेल्या मागील अतिवृष्टीदरम्यान वाघोली, विश्रांतवाडी, सुस आणि बावधान या भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली असता, या जवानांनी रबर बोटींच्या साहाय्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले होते, तर शांतीनगर येथील पूरग्रस्त निवासी इमारतीत अडकलेल्या नागरिकांची सुरक्षित सुटका केली होती. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असताना संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी सिंहगड रस्ता, नांदे आणि शिवणे जोडणारा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवून पथकाने चोख खबरदारी घेतली होती. याशिवाय, किर्कटवाडी येथील रस्त्यावरील झाडे हटवून वाहतूक कोंडी दूर करण्यापासून ते देहू येथील इंद्रायणी नदीत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे प्राण स्थानिक नागरिक व पोलिसांच्या मदतीने वेळेत वाचवण्यापर्यंत या जवानांनी अतुलनीय कामगिरी केली आहे.
पुणे जिल्ह्याने यापूर्वी माळीण येथील भीषण दरड दुर्घटना तसेच लवासा व पश्चिम घाट परिसरातील अतिवृष्टीमुळे घडणाऱ्या भूस्खलनाच्या घटना अनुभवल्या आहेत. या दुर्घटनांमधून धडा घेत केवळ आपत्तीनंतर बचावकार्य करण्यापेक्षा -प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यावर प्राधिकरणाचा विशेष भर आहे. यासाठी भूस्खलनास संभाव्य डोंगरउतार, घाट रस्ते व संवेदनशील गावांची माहिती स्थानिक प्रशासनाकडून सतत अद्ययावत केली जात आहे. अतिवृष्टीचा इशारा मिळाल्यास संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून नागरिकांना वेळेत सतर्क करणे, आवश्यकतेनुसार धोकादायक भागातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करणे आणि जलद प्रतिसादासाठी प्रशिक्षित बचाव पथके, बोटी, रोप रेस्क्यू साहित्य व कटिंग उपकरणे सतत सज्ज ठेवण्यात आली आहेत. स्थानिक ग्रामपंचायती, महसूल, पोलीस आणि आरोग्य विभागाशी समन्वय वाढवून मान्सूनपूर्व मॉक ड्रिल्स (सराव) व प्रत्यक्ष बचाव सरावही पूर्ण करण्यात आला आहे.
पुणे महानगर आपत्ती प्रतिसाद पथकाची (पीडीआरएफ) वैशिष्ट्ये -
- ३० कर्मचाऱ्यांचे विशेष पीडीआरएफ पथक तैनात
- पथकात अत्यंत कुशल आणि प्रशिक्षित अशा २० जवानांचा व १० वाहनचालकांचा समावेश
- आपत्तीच्या ठिकाणी अत्यंत जलद गतीने पोहोचण्यासाठी या पथकाला विशेष अत्याधुनिक वाहने, जीवरक्षक साधने आणि तांत्रिक उपकरणांनी सुसज्ज
- हे पथक मदत व पुनर्वसन कार्य, नियमित कठोर प्रशिक्षण आणि विविध यंत्रणांसोबत रंगीत तालीम करून सदैव तत्पर आहे.
नागरीकांना आवाहन - 'पीएमआरडीए'चे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी नागरिकांना मान्सून काळात सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. मुसळधार पावसादरम्यान डोंगरउतार, दरडीप्रवण भाग व कड्यांच्या पायथ्याशी थांबणे किंवा पर्यटनस्थळांवर जाणे पूर्णपणे टाळावे, असे त्यांनी म्हटले आहे. मातीमध्ये मोठ्या भेगा पडणे, झाडे किंवा विद्युत खांब झुकणे, डोंगरावरून दगड घसरू लागणे, घरांच्या भिंतींना तडे जाणे किंवा जमिनीत असामान्य हालचाल जाणवल्यास ही भूस्खलनाची प्रारंभिक लक्षणे असू शकतात. अशी चिन्हे दिसल्यास नागरिकांनी तात्काळ सुरक्षित स्थळी जावे व प्रशासनाला माहिती द्यावी. तसेच, वेगाने वाहणारे ओढे, नाले किंवा पूरग्रस्त रस्ते ओलांडण्याचा जीवघेणा प्रयत्न करू नये आणि हवामान विभाग तसेच स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती आढळल्यास नागरिकांनी तात्काळ ९५४५२८२९३० या 'पीडीआरएफ'च्या नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर संपर्क साधावा.