कृषी महाविद्यालयात मेसमध्ये फिल्टरचा शॉक लागून विद्यार्थ्याचा मृत्यू, संतप्त विद्यार्थ्यांनी पुकारले आंदोलन
कृषी महाविद्यालयात मेसमध्ये फिल्टरचा शॉक लागून विद्यार्थ्याचा मृत्यू, संतप्त विद्यार्थ्यांनी पुकारले आंदोलन
दोषींवर कठोर कारवाई करण्याची आणि संपूर्ण विद्युत यंत्रणेचे तातडीने ऑडिट करण्याची मागणी
पुणे, ता. २५ - पुण्यातील येथील कृषी महाविद्यालयात मेसमधील फिल्टर तपासताना लागलेल्या विजेच्या तीव्र धक्क्यामुळे एका विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला आहे. चैतन्य कुंडलिक चव्हाण (वय २३, रा. डोंगरगाव, ता. आष्टी, जि. बीड) असे मरण पावलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. १४ मार्चला रात्री त्याला शॉक बसला होता. त्याच्यावर उपचार सुरु असताना मंगळवारी (ता. २४) तो मरण पावला आहे. यामुळे, संतापलेल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले आहे. दोषींवर कठोर कारवाई करावी आणि संपूर्ण विद्युत यंत्रणेचे तातडीने ऑडिट करावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
चैतन्य चव्हाण कृषी महाविद्यालयात सध्या एग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंटच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. महाविद्यालयीन काळात तो 'ई मेस'चा कमिटी मेंबर म्हणून कार्यरत होता. मेसची व्यवस्था सुरळीत चालावी यासाठी तो नेहमी पुढाकार घ्यायचा. १४ मार्चला मेसमधील फिल्टर तपासत असताना अचानक त्याला विजेचा तीव्र धक्का बसला आणि तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरु होते, मात्र मंगळवारी त्याचा मृत्यू झाला.
चैतन्यच्या मृत्यूने संतापलेल्या विद्यार्थ्यांना आंदोलन सुरु केले आहे. दोषींवर कठोर कारवाई आणि संपूर्ण व्यवस्थेचे तातडीने ऑडिट करण्याची मागणी केली आहे. या घटनेनंतर महाविद्यालय प्रशासनाने जखमी चैतन्यच्या उपचारासाठी रुग्णालयाचा खर्च उचलला होता. मात्र, केवळ आर्थिक मदत पुरेशी नाही, तर त्याबरोबरच दोषींवर ठोस कारवाई झालीच पाहिजे, असे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. "मेसमधील फिल्टर आणि वीज व्यवस्थेबाबत विद्यार्थी दरवर्षी नव्या कमिटीमार्फत प्रशासनाला सूचना देत आहेत. तरीही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आजही काही ठिकाणी शॉक लागत आहे. " हे विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणून देत तातडीने विद्युत यंत्रणा सुरक्षित करण्याची मागणी केली आहे.
चौकशीसाठी समिती नेमली....
"घडलेली घटना ही अत्यंत दुर्देवी आहे. घटनेबद्दल चौकशीसाठी समिती नेमली असून यापुढे अशा घटना घडू नये, यासाठी काळजी घेतली जाईल.'' महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु विलास खर्चे यांनी सांगितले.