महाराष्ट्रातील कुस्ती ऑलिम्पिकपर्यंत पोचवण्यासाठी मॅटवरील कुस्तीला प्राधान्य गरजेचे - पैलवान हर्षवर्धन सदगीर
महाराष्ट्रातील कुस्ती ऑलिम्पिकपर्यंत पोचवण्यासाठी मॅटवरील कुस्तीला प्राधान्य गरजेचे - पैलवान हर्षवर्धन सदगीर
पुणे, ता. २४ - ''महाराष्ट्रातील कुस्ती ही आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा ऑलिम्पिकपर्यंत पोचवायची असेल तर मॅटवरील कुस्तीला प्राधान्य द्यायला हवे. महाराष्ट्रात कुस्ती म्हणजे मातीतील कुस्ती हीच भावना रुजली आहे. पण, मातीवरील व मॅटवरील कुस्तीमध्ये खूप फरक आहे. मातीतील कुस्तीपेक्षा मॅटवरील कुस्ती ही वेगवान व जास्त कस लावणारी आहे. '' असे यंदाचा महाराष्ट्र केसरी किताब विजेता पैलवान हर्षवर्धन सदगीर याने व्यक्त केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता हर्षवर्धनशी वार्तालाप आयोजित केला होता. यावेळी प्रशिक्षक अर्जुन पुरस्कार प्राप्त काका पवार, संघाचे सरचिटणीस मंगेश फल्ले, खजिनदार दिलीप तायडे उपस्थित होते.
या कार्यक्रमात हर्षवर्धनने आपला कुस्ती क्षेत्रातील प्रवास उलगडला. तो सांगत होता, ''जिथे अजूनही पाणी व पुरेशी वीज नाही अशा गावातून माझ्या कुस्तीची सुरवात झाली. आजोबांच्या प्रेरणेतून कुस्तीची गोडी लागली. आधी नाशिक व नंतर पुण्यात काका पवार यांच्या तालमीत प्रशिक्षण घेतले. सन २०२० ला प्रथम महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकली. पुन्हा एकदा मैदानात उतरायचे ध्येय समोर ठेऊन मेहनत करत राहिलो आणि पुन्हा एकदा यशस्वी झालो. माझ्या यशाचे श्रेय आई-वडील, गुरु यांना देतो. यापुढे हिंद केसरी आणि राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पदक मिळवणे हे माझे ध्येय आहे. तसेच स्वतःची एक छोटी व्यायामशाळा सुरु करण्याचे स्वप्न माझे स्वप्न आहे.'' नवीन मल्लांनी मेहनतीमध्ये सातत्य ठेवावे. तपश्चर्या केल्यास कोणत्याही खेळात यश हमखास मिळते, असा संदेश हर्षवर्धनने दिला.
''पहिल्यांदा केसरी स्पर्धेत विजेता झाल्यावर सरकारकडे चकरा मारुनही नाशिक महानगरपालिकेत क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्तीची अपेक्षा पूर्ण झाली नाही. आता सरकारने संधी दिल्यास मी नक्कीच नोकरी स्वीकारीन.'' असे हर्षवर्धन म्हणाला. ''कुस्तीत राजकारण घुसल्यामुळे तसेच संघटनांमधील वादामुळे खेळाडूंचे नुकसान होत आहे. मात्र, खेळाडूंनी हे वाद बाजूला ठेवून ऑलिम्पिकचे स्वप्न पाहावे. दरम्यान महाराष्ट्रानेही या खेळाला प्रोत्साहन द्यायला हवे. राज्यात सध्या तीन उपअधीक्षक कुस्तीपटू आहेत, सरकारने त्यांना सोबत घेऊन नवीन खेळाडू घडवण्यासाठी ठोस धोरणे बनवली पाहिजेत.'' असे मत हर्षवर्धनचे प्रशिक्षक काका पवार यांनी व्यक्त केले.