पुण्यात आढळला जन्मताच डोळे नसलेला 'तस्कर' साप, संशोधनाची अमेरीकेतील जर्नलमध्ये नोंद
पुण्यात आढळला जन्मताच डोळे नसलेला 'तस्कर' साप, संशोधनाची अमेरीकेतील जर्नलमध्ये नोंद
पुणे, ता. २४ - पाषाण-सुतारवाडी परिसरात जन्मताच डोळे नसलेला दुर्मीळ 'तस्कर' जातीचा साप आढळला. पुण्याचे सर्पमित्र अनिल कानस्कर आणि सोलापूरचे सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांनी या सापाबद्दल संशोधन केले. हे संशोधन अमेरीकेतील 'रेपटाईल्स अँड अँफीबियन्स' या जर्नलमध्ये नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे.
सर्पमित्र अनिल कानस्कर यांनी सांगितले की, पाषाण परिसरातील सुतारवाडी येथे १९ डिसेंबर २०२४ रोजी बचावकार्यादरम्यान हा साप आढळला. सुमारे २० सेंमी लांबीच्या या तस्कर सापाला डोळे नाहीत. डोळ्यांच्या जागी गुळगुळीत खवले असून, बाहुलीच नसल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. जबड्याची रचनाही थोडी वेगळी होती. या अवस्थेला शास्त्रीय भाषेत 'बायलॅटरल अनऑफथालमिया' असे म्हणतात. अशी स्थिती जन्मजात असून, भ्रूणावस्थेत डोळ्यांची निर्मिती न होणे किंवा अपूर्ण राहते. सापांमध्ये अशी स्थिती अत्यंत दुर्मीळ असून तस्कर जातीतील ही पहिली नोंद मानली जात असल्याचे सांगण्यात आले. इतर बाबतीत तो साप पूर्णपणे निरोगी असल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले. या कार्यासाठी पुणे वनविभागाचे रफीक शेख आणि गणेश माने यांनी सहकार्य केले.
अनिल कानस्कर म्हणाले, ''वेगळ्या वैशिष्ट्यांचा साप आढळणे हे आमच्यासाठीही अनोखे होते. तस्कर सापाला डोळे नसल्याचे पाहून राहुल शिंदे यांच्याशी संपर्क साधला. या सापाचे निरीक्षण करुन, त्यावर संशोधन करता आले, ही आनंदाची गोष्ट आहे.''