'हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो'चे काम अंतिम टप्यात, मे महिन्यात १२ स्थानके सुरु होणार
Mar 21 2026
71
'हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो'चे काम अंतिम टप्यात, मे महिन्यात १२ स्थानके सुरु होणार
पुणे, ता. २१ - 'पीएमआरडीए'चे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी गुरुवारी (ता. २०) माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाइनची प्रत्यक्ष पाहणी केली. 'माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो (लाइन ३)'चे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात या मार्गावरील १२ स्थानके मे २०२६ पर्यंत सुरु करण्याचे उद्दीष्ट आहे, असे डॉ. चौधरी यांनी सांगितले.
आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी माण ते शिवाजीनगर या २३.२ किलोमीटर लांबीच्या संपूर्ण मार्गिकेवरील २३ स्थानकांची पाहणी केली. यावेळी मुख्य अभियंता रिनाज पठाण आणि 'पीआयटीसीएमआरएल'चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार सैनी उपस्थित होते.
डॉ. चौधरी यांनी प्रत्यक्ष कामाचा दर्जा, तांत्रिक अडचणी आणि स्थानकांची सद्यःस्थिती याची सविस्तर पाहणी केली. सध्या या प्रकल्पाचे सुमारे ९४.२० टक्के काम पूर्ण झाले असून, सिग्नलिंगच्या तांत्रिक चाचण्या सुरु आहेत. आरडीएसओ आणि सीएमआरएस तपासणीची प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
ही मेट्रो सेवा सुरु झाल्यानंतर आयटी कर्मचाऱ्यांची व हिंजवडीतील नागरीकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. यावेळी डॉ. चौधरी यांनी कामाचा वेग वाढवताना गुणवत्ता आणि सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाऊ नये, अशा स्पष्ट सूचना कंत्राटदारांना दिल्या. या प्रकल्पाचा एकूण खर्च ८,३१३ कोटी रुपये इतका आहे.