पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनास १६ ऑगस्टपर्यंत पुन्हा मुदतवाढ, मुदतीनंतर सक्तीने भूसंपादन
पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनास १६ ऑगस्टपर्यंत पुन्हा मुदतवाढ, मुदतीनंतर सक्तीने भूसंपादन
पिंपरी, ता. ३ ऑगस्ट २०२६ - पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनास १६ ऑगस्टपर्यंत पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर, सक्तीने भूसंपादन करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
विमानतळासाठी आतापर्यंत सुमारे १ हजार १२५ हेक्टर जमिनीच्या संपादनाची संमतिपत्रे (कारारनामे) जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली असून, त्यातील सुमारे ५२ टक्क्यांहून अधिक भूसंपादनापोटीचा मोबदला शेतकऱ्यांच्या खात्यांवर थेट जमा करण्यात आला आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून जिल्हा प्रशासनाला आत्तापर्यंत २ हजार ६०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, त्याचे वाटप करण्यात आले आहे, तर आणखी ३ हजार १५० कोटी रुपयांचा निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पुरंदर तालुक्यातील सात गावांमधील १ हजार २१६ हेक्टर जमिनीचे विमानतळासाठी भूसंपादन करण्यात येणार आहे. आतापर्यंत १ हजार १२५ हेक्टर (९२.५ टक्के) क्षेत्राच्या जमिनीच्या संपादनासाठी करारनामे करण्यात आले आहेत. उर्वरित जमिनीचा तिढा उच्च न्यायालयात गेला आहे. ७५ हेक्टर जमिनीच्या करारनाम्यांसाठी ३१ जुलैची अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती, ती आता १६ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यानंतर शिल्लक राहिलेल्या जमिनीचे संपादन सक्तीने करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले. सक्तीने भूसंपादन केल्यानंतर सध्या देण्यात येत असलेला एकूण क्षेत्राच्या दहा टक्के विकसित भूखंड मिळणार नाही.
करारनामे झालेल्या क्षेत्रापैकी ६३० हेक्टर जमिनीचा म्हणजे सुमारे ५२ टक्के क्षेत्राच्या भूसंपादनापोटीचा मोबदला शेतकऱ्यांच्या खात्यांवर थेट जमा करण्यात आला आहे. भूसंपादनापोटी मिळणाऱ्या मोबदल्यातून शेतकऱ्यांना योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याबाबतही जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्याचा फायदा अनेक शेतकऱ्यांना होत आहे.
- भूसंपादन मुदतवाढ, Land Acquisition Deadline Extension
- छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ, Chhatrapati Sambhaji Raje International Airport, पुरंदर विमानतळ भूसंपादन, Purandar Airport Land Acquisition
- पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ, Purandar International Airport
- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, Collector Jitendra Dudi,