कुदळवाडी ते घरकुल स्पाईन रोडवरील वाहतूक कोंडी व इतर प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन

कुदळवाडी ते घरकुल स्पाईन रोडवरील वाहतूक कोंडी व इतर प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन

 कुदळवाडी ते घरकुल स्पाईन रोडवरील वाहतूक कोंडी व इतर प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मारुती जाधव यांचा पुढाकार, निवेदनानंतर कार्यवाहीच्या सूचना 

पिंपरी, ता. ३ ऑगस्ट २०२६ - चिखली परिसरात कुदळवाडी चौक ते घरकुल चेरीज स्वीट चौक दरम्यानच्या स्पाईन रोड व सर्व्हिस रोडवर दिवसेंदिवस वाहतूक कोंडी, अनधिकृत पार्किंग, सार्वजनिक फुटपाथवरील संशयित अनधिकृत बांधकाम तसेच वृक्षतोड या तक्रारींची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मारुती गणपत जाधव यांनी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात, चिखली परिसरात कुदळवाडी चौक ते घरकुल चेरीज स्वीट चौक दरम्यानच्या विविध समस्या सविस्तर मांडल्या आहेत.  कुदळवाडी चौक ते कृष्णानगर संविधान चौक या स्पाईन रोडवरील सर्व्हिस रोड परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत पार्किंग होत असल्याने स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि विविध गृहनिर्माण सोसायट्यांमधील रहिवाशांना दररोज गंभीर त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

डॉल्फिन विस्टा सोसायटीलगत असलेले स्टार बाजार, मॅट्रिक्स क्लासेस, मौर्य फोर हॉटेल, घरकुल चौकाच्या पुढील परिसरातील विविध व्यावसायिक आस्थापने, सूर्य हॉस्पिटल तसेच कृष्णानगर पोलीस लाईनसमोरील बस पार्किंगमुळे सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. रस्त्यावर व प्रवेशमार्गांमध्ये वाहने उभी राहत असल्याने सोसायटीतील नागरिकांना सुरक्षितपणे ये-जा करणे कठीण होत असल्याचेही जाधव यांनी निदर्शनास आणून दिले.

कुदळवाडी ब्रिजच्या मुख्य चौकापासून घरकुल मुख्य चौकापर्यंतचे सुमारे ३०० मीटर अंतर पार करण्यासाठी नागरिकांना अनेकदा अर्धा ते पाऊण तास वाहतूक कोंडीत थांबावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ व इंधन वाया जात असून दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत आहे.

तसेच, डॉल्फिन विस्टा सोसायटीलगत असलेल्या परिसरात अनधिकृत पार्किंगचा विळखा वाढल्याने सर्व्हिस रोडची वाहतूक व्यवस्था कोलमडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सार्वजनिक फुटपाथवर उभारण्यात आलेल्या संशयित अनधिकृत जिन्याची पाहणी करून त्याची परवानगी, मंजूर नकाशा व कायदेशीरतेची तपासणी करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

परिसरातील काही झाडांची आवश्यक परवानगीशिवाय छाटणी किंवा तोड करण्यात आल्याची नागरिकांची तक्रार असून, याबाबत संबंधितांकडे परवानगीचे पुरावे मागितल्यानंतर समाधानकारक माहिती मिळाली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका, अग्निशमन दल व इतर आपत्कालीन सेवांना वेळेत पोहोचण्यात अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे मारुती जाधव यांनी निवेदनात नमूद केले आहे. 

याबाबत बोलताना मारुती जाधव म्हणाले, ''या संदर्भात उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रकरणाची तातडीने दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक, चिखली वाहतूक विभाग तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक, चिखली पोलिस स्टेशन यांनाही स्वतंत्र निवेदने देण्यात आली आहेत. सर्व्हिस रोडवरील अनधिकृत पार्किंग हटवून वाहतूक सुरळीत करावी, आपत्कालीन मार्ग खुला ठेवावा, आवश्यक त्या ठिकाणी ‘नो पार्किंग’ फलक लावावेत आणि संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कुदळवाडी चौक ते घरकुल परिसरातील वाहतूक कोंडी ही केवळ दैनंदिन गैरसोय नसून नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित गंभीर समस्या आहे. प्रशासनाने तातडीने संयुक्त पाहणी करून अनधिकृत पार्किंग व अतिक्रमणावर कारवाई करावी आणि नागरिकांना कायमस्वरूपी दिलासा द्यावा.''



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories