रहाटणी | १९ ऑक्टोबर २०२६ : औषध खरेदी करण्यास दुसऱ्या दुकानात का पाठवता या वादातून एका डॉक्टरला क्लिनिकमध्ये शिवीगाळ आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना रहाटणी परिसरात घडली. या प्रकरणात डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. सांगवी पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास रहाटणी येथील शिवाजी पुतळ्याजवळ असलेल्या श्री महावीर क्लिनिकमध्ये ही घटना घडली.
या प्रकरणी डॉ. संदीप वसंतलाल लुनावत (वय ५८ वर्षे, व्यवसाय डॉक्टर, रा. विशालनगर, पिंपळे निलख, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, क्लिनिकच्या शेजारी असलेल्या गुरुकृपा मेडिकलचे चालक-मालक ओंकार सुनील पाटील (वय २५ वर्षे) हे ओपीडीमध्ये आले. त्यांनी क्लिनिकमध्ये येणाऱ्या रुग्णांना दिलेल्या औषधांच्या चिठ्ठ्या दुसऱ्या मेडिकलमध्ये न पाठवता आपल्या मेडिकलमध्येच पाठवाव्यात, असे डॉक्टरांना सांगितले.
त्यावर डॉक्टरांनी रुग्णांना कोणत्या मेडिकलमधून औषधे घ्यायची, हा त्यांचा निर्णय असल्याचे सांगितले. यानंतर दोघांमध्ये वाद झाला. आरोपीने मोठमोठ्याने आरडाओरडा केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान, ओंकार पाटील यांची आई क्लिनिकमध्ये आल्या. त्यांनी क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे.
त्यावेळी फिर्यादींची मुलगी भांडण सोडविण्यासाठी गेली असता तिलाही शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
त्यानंतर आरोपी ओंकार पाटील यांची बहीण, तिचा नवरा आणि सासरकडील इतर दोन व्यक्ती क्लिनिकमध्ये आल्या. त्यांनीही डॉक्टरांना शिवीगाळ व हाताने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी ओंकार सुनील पाटील, तीन महिला आरोपी आणि इतर दोन अनोळखी व्यक्ती अशा सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७०१/२०२६ नोंदविण्यात आला असून, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२९(४), १८९(२), १९०, १९१(२), ११५(२), ३५२ आणि ३५१(२) तसेच महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था अधिनियम, २०१० मधील कलम ४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत.