राज्य परिवहन विभागाची नवी सेवा लवकरच ........'२४ बाय ७ व्हॉट्सअॅप चॅटबॉट'
पुणे, ता. १४ - 'आरटीओ'शी संबंधित विविध सेवाची माहिती नागरीकांना सुलभतेने उपलब्ध व्हावी यासाठी राज्य परिवहन विभाग '२४ बाय ७ व्हॉट्सअॅप चॅटबॉट सेवा' सुरु करणार आहे. या सेवेद्वारे नागरिकांना वाहन नोंदणी, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन कर, नूतनीकरण आणि चलन यासारख्या सेवांबद्दलची माहिती थेट त्यांच्या मोबाईलवर मिळणार आहे. प्रशासनाने याबाबत माहिती दिली आहे.
'२४ बाय ७ व्हॉट्सअॅप चॅटबॉट सेवा' या प्रकल्पावर रस्ता सुरक्षा निधीतून निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. प्रकल्पाचा खर्च अंदाजे २.३६ कोटी आहे. चॅटबॉटद्वारे नागरीकांना 'आरटीओ'शी संबंधित सर्व माहिती मिळणार आहे. रस्ते सुरक्षा जागरुकता मोहिमा देखील राबवल्या जाणार आहेत. हेल्मेट आणि सीटबेल्ट वापराविषयी संदेश, इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याबाबत माहिती, रिअल टाइम ट्रॅफिक अपडेट्स आणि पर्यायी मार्गांसाठी सूचना दिल्या जातील. याशिवाय, अपघात, पूर किंवा इतर आपत्तींसारख्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तात्काळ सूचना आणि आवश्यक मार्गदर्शनही याद्वारे मिळणार आहे.
चॅटबॉट सेवेद्वारे संकलित होणाऱ्या माहितीचा उपयोग रस्ता सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थापनाशी संबंधित धोरणे तयार करण्यास होणार आहे. याबाबत सांगताना राज्य परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर म्हणाले की, ''नागरिकांना वाहनांशी संबंधित जास्तीत जास्त सेवा डिजिटल आणि सोयीस्कर पद्धतीने प्रदान करणे हे आमचे ध्येय आहे. व्हॉट्सअप चॅटबॉट हे या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.''