''स्मार्ट सिटीच्या माध्यमातून झालेल्या सर्व कामांची श्वेतपत्रिका काढावी''
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रमोद कुटे यांची सर्वसाधारण सभेत मागणी
पिंपरी, ता. १४ - गेल्या चार वर्षांत स्मार्ट सिटीचे कोणतेही काम गेल्या पूर्णत्वाकडे गेले नाही. प्रत्येक बैठकीत आम्हाला वेगवेगळ्या स्वरुपाचे मस्त शहर दाखविले होते. प्रत्यक्षात काहीच झाले नाही. त्यामुळे गेल्या नऊ वर्षात प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदांची माहिती द्यावी. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून झालेल्या सर्व कामांची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रमोद कुटे यांची सर्वसाधारण सभेत यांनी केली.
नगरसेवक प्रमोद कुटे म्हणाले, ''मागील नऊ वर्षात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरात विविध कामे झाली आहेत. माझ्या प्रभागात कमांड आणि कंट्रोल सेंटर आहे. शहरातील सीसीटीव्ही कॅमे-यांचा डेटा तेथे रेकॉर्डिंग होतो. कोठे चोरी झाली तर डेटा पाहून पोलिसांना कारवाई करणे सोपे जाईल. नागरिकांनाही डेटा उपलब्ध करुन द्यावा. शहरातील ८० टक्के सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. येथील कर्मचारी निवांत काम करीत असतात. स्मार्ट सिटीवर पाच वर्षे संचालक म्हणून मी काम केले आहे. प्रत्येक मिटींगमध्ये आम्हाला वेगवेगळ्या स्वरुपाचे मस्त शहर दाखविले होते. गेल्या चार वर्षांत कोणतेही काम पूर्णत्वाकडे गेले नाही. ''
''आम्ही दिल्लीतील शाळांची पाहणी केली. शिक्षण बदलण्याचा एक करार केला. पण, कधीही दिल्लीचे शिक्षक येथे आले नाहीत आणि येथील शिक्षक दिल्लीला गेले नाहीत. स्मार्ट सिटीच्या नावाखाली महापालिका शाळामध्ये मोठ्या स्क्रीन लावण्यात आल्या आहेत. शिक्षक नेमले होते, तेही आता नाही. '' हे कुटे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
''सिग्नल सिंक्रोनाइजच्या माध्यमातून वाहतूक कोंडी सुटेल असे सांगितले. प्रत्यक्षात कोंडी सुटली नाही. पिंपळे गुरवला स्मार्ट बस स्थानक झाले नाही. स्वच्छतागृह बंद आहेत. सायकल शेअरिंग प्रकल्प एकाच दिवसांत गुंडाळला गेला. एका ॲपवर पीएमपी, रेल्वे सर्व सार्वजनिक वाहतुकीची माहिती दिली जाईल असे सांगितले. प्रत्यक्षात काही झाले नाही. ऑनलाइन कामकाज एटॉस नावाच्या कंपनीच्या माध्यमातून केले जात आहे. ही प्रणाली सुरळीत चालत नाही. दोन महिन्याला प्रणाली ठप्प असते. दोन ते अडीच हजार कोटी खर्च केले आहेत. त्यामुळे गेल्या नऊ वर्षात प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदांची माहिती द्यावी. '' असा हल्लाबोल कुटे यांनी केला. कुटे यांनी विचारलेल्या ''शहरात ३३०० सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. या कॅमे-यांची लाइफ किती आहे ?'', या प्रश्नावर अधिकारी निरुत्तर झाले. तांत्रिक माहिती घेऊन सांगतो असे उत्तर स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी दिले.