पिंपरी-चिंचवड : सण-उत्सवातून सामाजिक प्रश्नांवर जनजागृती करण्याची परंपरा वाकड-थेरगाव परिसरातील भगवती रॉयल हौसिंग सोसायटीने यंदाही जपली. नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित रावण दहन कार्यक्रमात रावणाच्या पारंपरिक दहा तोंडांसोबत अकरावे तोंड जोडून पाण्याचा अपव्यय टाळण्याचा संदेश देण्यात आला. गेल्या १४ वर्षांपासून 'एक सोसायटी, एक उत्सव' या संकल्पनेतून विविध उपक्रम राबवणाऱ्या सोसायटीच्या कार्यक्रमांना रहिवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
रावणाच्या प्रतिकृतीतील अकरावे तोंड पाणीबचतीचे प्रतीक म्हणून साकारण्यात आले होते. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर करावा, हा या उपक्रमाचा उद्देश होता. सोसायटीच्या व्यवस्थापन समितीने पारंपरिक पद्धतीने वाहने धुण्यास बंदी घातली. एका लहान मुलीने तयार केलेल्या रीलमधूनही पाणीबचतीचा संदेश रहिवाशांपर्यंत पोहोचवण्यात आला.
सोसायटीतील रहिवासी आणि कवयित्री संध्या अमित टिंगरे यांनी रचलेल्या 'का हो आभाळ रुसलं?' या कवितेतून पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले. या कवितेचे वाचन 'वेलवेट व्हर्सेस' या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून सोसायटीच्या व्हॉट्सॲप समूहावर प्रसारित करण्यात आले.
या उपक्रमाला उपस्थित असलेले प्रवीण कदम यांनी भविष्यातील कार्यक्रमांचे नियोजन आणि आवश्यक खबरदारी याबाबत मार्गदर्शन केले. तर योगेश पाटील यांनी पाण्याचा अपव्यय टाळण्याचा निर्धार करणे हे आजच्या काळातील खरे सीमोल्लंघन असल्याची भावना व्यक्त केली.
नवरात्रोत्सवादरम्यान वाकड पोलीस ठाण्याच्या वतीने सायबर सुरक्षा आणि सामाजिक जागृतीविषयक व्याख्यान आयोजित करण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले उपस्थित होते. मोबाईलच्या अतिवापराचे परिणाम आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा मानवी मेंदूवर होणारा संभाव्य परिणाम या विषयांवरही चर्चा झाली.
आयआयटी मुंबईशी संबंधित डॉ. अमोल पाटील यांनी सार्वजनिक काम करताना परस्पर विश्वास, संवाद आणि समन्वय राखण्याचे महत्त्व स्पष्ट केले. कोणतीही संघटना दीर्घकाळ टिकवण्यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
उत्सवात महाप्रसाद, भंडारा, आनंद मेळा, दांडिया, सांस्कृतिक कार्यक्रम आणि बालकलागुणांचे सादरीकरण आयोजित करण्यात आले. सोसायटीतील कामगार आणि घरकाम करणाऱ्या महिलांनाही महाप्रसादासाठी सन्मानपूर्वक आमंत्रित करण्यात आले. घरगुती खाद्यपदार्थ आणि खेळांच्या स्टॉलमुळे आनंद मेळ्याला चांगला प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमांच्या नियोजनात कल्याणी मनोज चौधरी यांच्यासह महिला सदस्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
सोसायटीतील रहिवाशांनी साकारलेल्या 'एकच वादा अजित दादा!' या जिवंत देखाव्याला सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा २०२६ मध्ये पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुका गटात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याबद्दल सहभागींचा सत्कार करण्यात आला.
यंदाच्या रावण दहनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बाहेरील व्यावसायिक एजन्सीची मदत न घेता रहिवाशांनी स्वतः रावणाची प्रतिकृती, सजावट, विद्युत रोषणाई आणि व्यासपीठ उभारणीची कामे केली. रावणाच्या प्रतिकृतीसाठी जुने कागद, रद्दी, बांबू आणि इतर साहित्याचा वापर करण्यात आला. अग्निसुरक्षेसाठी आवश्यक खबरदारी घेण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
या उपक्रमात उत्सव मंडळाचे अध्यक्ष मयूर पवार, उपाध्यक्ष उमेश पेंडभाजे, खजिनदार चिंतन कंसारा यांच्यासह अनमोल पाटील, मनोज चौधरी, सतीश कोलगे, अमोल वाघ, प्रभाकर कुमार, मयंक अग्रवाल, राहुल जहागीरदार, मनीषराज सत्य, हर्षल कोळी, सचिन आणि इतर रहिवाशांनी योगदान दिले.
सोसायटीने यापूर्वी २०१९ मधील महापुराच्या काळात पूरग्रस्तांसाठी मदत पाठवली होती. राजहंस पाटील आणि सुनील आचरे यांच्या पुढाकाराने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचीही यावेळी आठवण करून देण्यात आली.
गेल्या १४ वर्षांपासून भगवती रॉयल सोसायटीमध्ये विविध धार्मिक, राष्ट्रीय आणि सांस्कृतिक सण सामूहिकरीत्या साजरे केले जातात. या उपक्रमांतून रहिवाशांमधील संवाद, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यंदाचा नवरात्रोत्सवही पाणीबचत, पर्यावरण संवर्धन, सामाजिक जागृती आणि सामूहिक एकतेचा संदेश देणारा ठरला.