आई आजारी असल्याचे सांगून वृद्धेची फसवणूक; अडीच तोळ्यांचे मंगळसूत्र हातचलाखीने लंपास

आई आजारी असल्याचे सांगून वृद्धेची फसवणूक; अडीच तोळ्यांचे मंगळसूत्र हातचलाखीने लंपास

चाकण | २८ ऑगस्ट २०२६ : आई आजारी असून ती बरी व्हावी यासाठी गरजू आणि वयोवृद्ध व्यक्तीला दान करायचे आहे, असे सांगत दोन अनोळखी व्यक्तींनी एका वृद्ध महिलेची फसवणूक केली. आरोपींनी महिलेचा विश्वास संपादन करून तिचे १ लाख ५० हजार रुपये किमतीचे अडीच तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र हातचलाखीने लंपास केले.

ही घटना २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० ते ११.४५ या वेळेत भोसे गावठाणातील महादेव मंदिर परिसरात, चाकण–शिक्रापूर रस्त्यावर घडली. याप्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी वृद्ध महिलेला गाठून आपली आई आजारी असल्याचे सांगितले. आईच्या आरोग्यासाठी गरजू आणि वयोवृद्ध व्यक्तीला पैसे दान करायचे असल्याचे सांगून त्यांनी महिलेचा विश्वास जिंकला. त्यानंतर आरोपींनी सोन्याचे मंगळसूत्र आणि रोख रक्कम एका पिशवीत ठेवत असल्याचे भासवले.

आरोपींनी बोलण्यात गुंतवून महिलेच्या अडीच तोळ्यांच्या मंगळसूत्राची हातचलाखीने अदलाबदल केली आणि ते घेऊन घटनास्थळावरून निघून गेले. काही वेळाने पिशवी तपासल्यानंतर मंगळसूत्र गायब असल्याचे महिलेच्या लक्षात आले.

याप्रकरणी गुन्हा क्रमांक ७२३/२०२६ नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण उत्तर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories