आळंदी | २८ ऑगस्ट २०२६ : एक लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास शनिवार, रविवार आणि शासकीय सुट्टी वगळता दररोज ५०० रुपये परतावा देण्याचे आमिष अनेक गुंतवणूकदारांना महागात पडले. एका महिलेसह दोघांनी अनेकांकडून पैसे स्वीकारून एकूण ३३ लाख ४४ हजार ४२५ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी राहुल भोलेनाथ भोसले (वय ३०) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एका महिलेसह भागवत गंगाधर परहाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी २०२४ ते २७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत धानोरे फाटा परिसरात घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी गुंतवणुकीची आकर्षक योजना सुरू केली होती. या योजनेत एक लाख रुपये गुंतवल्यास शनिवार, रविवार आणि शासकीय सुट्टीचे दिवस वगळून दररोज ५०० रुपये परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले.
या आमिषावर विश्वास ठेवून योगेश जनार्दन वंजारी यांनी १ लाख ७० हजार रुपये, यशवंत बाळासाहेब गाडवे यांनी १० लाख रुपये, तर शुभम बाळमोहर लोखंडे आणि मोनिका बाळासाहेब लोखंडे यांनी एकूण ६ लाख रुपये गुंतवले. फिर्यादीसह अन्य गुंतवणूकदारांकडून आरोपींनी एकूण ३३ लाख ४४ हजार ४२५ रुपये स्वीकारले.
मात्र, ठरल्याप्रमाणे परतावा किंवा मूळ रक्कम देण्यात आली नाही. पैसे मागितल्यानंतर आरोपींनी टाळाटाळ केल्याने गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३५८/२०२६ नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहिता आणि एमपीआयडी कायद्यानुसार पुढील तपास सुरू आहे.