भोसरी | २८ ऑगस्ट २०२६ : लांडेवाडी परिसरातील सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या पत्त्यांच्या जुगारावर एमआयडीसी भोसरी पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पाच जणांना ताब्यात घेऊन २ लाख ५४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई २७ ऑगस्ट रोजी दुपारी १.५० वाजण्याच्या सुमारास इलेक्ट्रिक सदनसमोरील उद्यानाजवळ, भोसरी ते निगडी जाणाऱ्या रस्त्यालगत करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक नितीन आप्पा देसाई यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी संजय नारायण खुडे (वय ४८), राजू हनुमंत राठोड (वय ३६), महमद हुसेन नदाफ (वय ३५), सुभाष अंगद लोंढे (वय ४६) आणि उमेश शंकर चव्हाण (वय ३८) यांच्याविरोधात कारवाई केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सार्वजनिक ठिकाणी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पैशांवर पत्त्यांचा जुगार खेळत होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. आरोपींकडून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य आणि अन्य मुद्देमाल असा एकूण २ लाख ५४ हजार ८०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५०६/२०२६ नोंदविण्यात आला आहे. आरोपींविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.