इन्स्टाग्रामवरील शेअर बाजाराची जाहिरात पडली महागात; महिलेची २७.६६ लाखांची फसवणूक

इन्स्टाग्रामवरील शेअर बाजाराची जाहिरात पडली महागात; महिलेची २७.६६ लाखांची फसवणूक

मोशी | २८ ऑगस्ट २०२६ : इन्स्टाग्रामवर दिसलेली शेअर बाजारातील गुंतवणुकीची जाहिरात एका महिलेला तब्बल २७ लाख ६६ हजार रुपयांना महागात पडली. मोठा आर्थिक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर चोरट्यांनी महिलेकडून विविध बँक खात्यांमध्ये पैसे जमा करून घेतले. मात्र, वेबसाइटवर दिसणारा नफा काढण्याचा प्रयत्न करताच आरोपींनी आणखी पैसे भरण्याची मागणी केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही फसवणूक २४ जून ते २६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत झाली. फिर्यादी महिलेला इन्स्टाग्रामवर Share Market/Investment संदर्भातील जाहिरात दिसली होती. जाहिरातीतील लिंक उघडल्यानंतर तिला एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी करण्यात आले.

आरोपींनी HNW (High-Net-Worth) Customer Service आणि Julius Baer या नावांचा वापर करून शेअर बाजारातील खासगी गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन करण्याचे भासवले. त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून महिलेने वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण २७ लाख ६६ हजार रुपये जमा केले.

त्यानंतर संबंधित वेबसाइटवर गुंतवणुकीवर मोठा नफा झाल्याचे दाखवण्यात आले. मात्र, फिर्यादीने रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता व्यवहार पूर्ण झाला नाही. पैसे काढण्यासाठी १४ लाख ८३ हजार ९५३ रुपये ७० पैसे ‘ब्रोकरेज फी’ भरण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसांकडे तक्रार केली.

याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४४४/२०२६ नोंदवण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories