चिंचवड | २८ ऑगस्ट २०२६ : ऑनलाइन ट्रेडिंगमध्ये गुंतवलेली रक्कम तीन ते चारपट करून देण्याचे आमिष चिंचवडमधील व्यावसायिकाला १३ लाख २० हजार रुपयांना महागात पडले. टेलिग्राम आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून विश्वास संपादन करून आरोपींनी संबंधित व्यक्तीकडून ऑनलाइन पैसे स्वीकारल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी प्रमोद हिम्मतराम पुरोहित (वय ३३) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या मोबाईलवर टेलिग्रामच्या माध्यमातून ऑनलाइन ट्रेडिंगबाबत संदेश आणि लिंक पाठवण्यात आली. आरोपींनी Quotex Binary Trading मध्ये गुंतवणूक केल्यास जमा केलेल्या रकमेवर तीन ते चारपट नफा मिळेल, असे सांगितले. जास्त परताव्याच्या आमिषावर विश्वास ठेवून फिर्यादीने आरोपींनी सांगितलेल्या पद्धतीने वेळोवेळी पैसे जमा केले.
या व्यवहारासाठी @realdeepwin, @dwtsupports आणि @legendoftrading या सोशल मीडिया अकाउंटसह विविध ट्रेडिंग लिंकचा वापर करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. फिर्यादीने एकूण १३ लाख २० हजार ३६२ रुपये गुंतवले; मात्र त्यांना आश्वासनानुसार नफा किंवा गुंतवलेली मूळ रक्कम परत मिळाली नाही.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पुरोहित यांनी पोलिसांकडे तक्रार केली. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४९०/२०२६ नोंदविण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.