हिंजवडीत तरुणाकडून ‘एमडी’ जप्त; ५.५९ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

हिंजवडीत तरुणाकडून ‘एमडी’ जप्त; ५.५९ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

हिंजवडी | २८ ऑगस्ट २०२६ : माण–हिंजवडी रस्त्यावर अमली पदार्थविरोधी कारवाई करत पोलिसांनी एका २३ वर्षीय तरुणाकडून १० ग्रॅम मेफेड्रोन अर्थात ‘एमडी’ जप्त केले. एमडी आणि इतर साहित्य मिळून या कारवाईत एकूण ५ लाख ५९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ही कारवाई २७ ऑगस्ट रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास माणकडून हिंजवडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर, गोदरेज कंपनीच्या बांधकाम साइटजवळील सार्वजनिक मार्गावर करण्यात आली.

पोलिसांनी या प्रकरणात मोहम्मद फैजान अयुब बागवान (वय २३, रा. कोंढवा, पुणे) याला अटक केली आहे. पोलिसांना आरोपी अमली पदार्थासह संबंधित परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने परिसरात सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले.

झडतीदरम्यान आरोपीकडे १ लाख रुपये किमतीचे १० ग्रॅम एमडी आढळून आले. अमली पदार्थासह अन्य साहित्य असा एकूण ५ लाख ५९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

आरोपी हा अमली पदार्थ कोठून घेऊन आला, त्याचा पुरवठादार कोण आहे आणि तो कोणाला विक्री करणार होता, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचीही चौकशी करण्यात येत आहे.

याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६९२/२०२६ नोंदविण्यात आला आहे. आरोपीविरोधात अमली पदार्थविरोधी कायद्याच्या कलम ८(क) आणि २१(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories