पिंपरी-चिंचवडमध्ये अमली पदार्थविरोधी जनजागृती; 170 हून अधिक शिक्षक-प्राचार्यांचा सहभाग
पिंपरी-चिंचवडमध्ये अमली पदार्थविरोधी जनजागृती; 170 हून अधिक शिक्षक-प्राचार्यांचा सहभाग
पिंपरी-चिंचवड : शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना अमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ-1 अंतर्गत अमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. संत तुकारामनगर येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयात गुरुवार, 27 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेत हा कार्यक्रम पार पडला. परिमंडळ-1 कार्यक्षेत्रातील शाळा आणि महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहआयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) सारंग आवाड आणि अपर पोलीस आयुक्त, प्रादेशिक विभाग बसवराज तेली यांच्या आदेशानुसार हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमात तज्ज्ञ मार्गदर्शक विल्यम साळवे यांनी अमली पदार्थांचे प्रकार, त्यांचे शरीर आणि मानसिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम तसेच तरुणांमध्ये वाढणाऱ्या व्यसनाधीनतेबाबत मार्गदर्शन केले. अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी विद्यार्थ्यांमधील व्यसनाची प्राथमिक लक्षणे, संशयास्पद हालचाली आणि अशा घटनांची माहिती पोलिसांना देण्याची प्रक्रिया समजावून सांगितली.
परिमंडळ-1 चे पोलीस उपायुक्त संदीप आटोळे, सांगवी विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त मनीषा कदम आणि पिंपरी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले यांनी शाळा-महाविद्यालयांमध्ये अमली पदार्थविरोधी जनजागृती राबविण्याबाबत प्राचार्य, मुख्याध्यापक आणि शिक्षकांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांशी सातत्याने संवाद साधणे, त्यांच्या वर्तनातील बदल वेळेत ओळखणे आणि पालकांना याबाबत जागरूक करणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, दापोडी येथील शिक्षक मिलिंद संधान, मॉडर्न कॉलेज निगडीचे डॉ. सत्यवान कुंभार आणि सरस्वती विद्यालय आकुर्डीच्या शिक्षिका मोहिनी अणेकर यांनीही अमली पदार्थविरोधी जनजागृतीसंदर्भात आपली मते मांडली.
कार्यक्रमाला परिमंडळ-1 कार्यक्षेत्रातील विविध शाळा आणि महाविद्यालयांमधील सुमारे 170 ते 180 प्राचार्य, मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी व्यसनमुक्तीसंदर्भात शपथ घेतली.
या कार्यक्रमाला निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे, चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चासकर, पिंपरी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे, संत तुकारामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड, दापोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख कुंभार आणि सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते.