पिंपरी | २८ ऑगस्ट २०२६ : भाटनगर परिसरात गांजा बाळगणाऱ्या व्यक्तीवर पोलिसांनी कारवाई करत गांजा आणि दुचाकीसह दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई २६ ऑगस्ट रोजी रात्री ११.२५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
याप्रकरणी पोलिसांनी गणेश ताराचंद मलेकर (वय ३६, रा. भाटनगर, पिंपरी) याला ताब्यात घेतले आहे. अमली पदार्थविरोधी पथकातील पोलीस अंमलदार रोहित सुदाम वाघमारे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाटनगर परिसरात एक व्यक्ती ज्युपिटर दुचाकीवरून गांजा घेऊन येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले.
झडतीदरम्यान आरोपीकडे एकूण १ किलो ७९२ ग्रॅम वजनाचा आणि निव्वळ १ किलो ७६४ ग्रॅम गांजा आढळून आला. जप्त गांजाची अंदाजे किंमत ८८ हजार २०० रुपये आहे. तसेच आरोपीच्या ताब्यातील १ लाख १२ हजार रुपये किमतीची ज्युपिटर मोपेड जप्त करण्यात आली.
या कारवाईत गांजा आणि दुचाकी असा एकूण २ लाख २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. आरोपी गांजा कोठून घेऊन आला आणि तो कोणाला विकणार होता, याबाबत तपास सुरू आहे.
याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६१५/२०२६ नोंदविण्यात आला आहे. आरोपीविरोधात अमली पदार्थविरोधी कायद्याच्या कलम ८(क), २०(ब)(ii)(ब) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.