news
clock
सुरक्षित रेल्वे प्रवासासाठी कवच प्रणाली कार्यान्वित, पुणे विभागात यशस्वी चाचणी

सुरक्षित रेल्वे प्रवासासाठी कवच प्रणाली कार्यान्वित, पुणे विभागात यशस्वी चाचणी

सुरक्षित रेल्वे प्रवासासाठी कवच प्रणाली कार्यान्वित, पुणे विभागात यशस्वी चाचणी 

पिंपरी, ता. १६ -  रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित होण्यासाठी देशातील महत्त्वाच्या लोहमार्गांवर 'कवच' प्रणाली लागू होणार आहे. या प्रणालीद्वारे रेल्वे चालकाला आता इंजिनमध्येच सात किलोमीटर दूर असलेला सिग्नल दिसणार आहे. त्यामुळे योग्यवेळी रेल्वेचा वेग नियंत्रित करता येणार असल्याने अपघात टाळता येणार आहेत.  पुणे विभागातील पुणे-कोल्हापूर व दौंड-मनमाड दरम्यान कवच प्रणालीची चाचणी यशस्वी झाली आहे. रेल्वेच्या पुणे विभागातर्फे ही माहिती देण्यात आली आहे.

 रेल्वे मंत्रालयाने १६ जुलै २०२४ ला 'कवच ४.०' प्रणालीसाठी मंजुरी दिली होती. पूर्वीच्या 'कवच २.०' कवच यंत्रणेत त्रुटी होत्या. या त्रुटी दूर करुन रेल्वे प्रशासनाने 'कवच ४.०' प्रणाली विकसित केली. ही प्रणाली आता देशातील १० हजार रेल्वे इंजिनमध्ये बसविली जात आहे. आत्ता, ९ हजार किलोमीटरच्या अंतरात 'कवच ४.०' बसविण्याचे काम वेगाने सुरु आहे. यामध्ये, पुणे विभागात २५० किलोमीटर अंतरावर व ८० हून अधिक रेल्वे इंजिनमध्ये कवच '४.०' यंत्रणा बसविली गेली आहे, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

''पुणे विभागात ७०० किलोमीटरच्या मार्गांपैकी २५० किमीपेक्षा जास्त अंतरावर 'नॉन-सिग्नलिंग कवच' प्रणालीची चाचणी घेण्यात आली आहे. या प्रगत तंत्रज्ञानामुळे रेल्वे गाड्यांची समोरासमोर व पाठीमागून धडक होण्याच्या अपघातांना आळा बसेल आणि सिग्नल ओलांडण्याच्या चुकाही होणार नाहीत. उर्वरित मार्गावरदेखील 'कवच' प्रणाली बसविण्याचे काम वेगाने सुरू आहे.''

- हेमंत कुमार बेहरा, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे, पुणे विभाग

अशी आहे 'कवच' प्रणाली...

कवच प्रणाली ही रेल्वेच्या इंजिनमध्ये (टीसीएएस - ट्रेन कॉलेजन अव्हॉइड सिस्टीम) ही प्रणाली बसविली जाते. ही प्रणाली लोहमार्गावरील सिग्नलला कम्युनिकेशन टॉवरद्वारे जोडली जाते. सदर प्रणालीद्वारे, वेगाने धावत असलेल्या गाडीने सिग्नल मोडला तर आपोआप ब्रेक लागून गाडी थांबते. त्यामुळे पुढचा अपघात टळतो. तसेच सहाय्यक रेल्वे चालकाला स्पॉट सिग्नल पाहण्याची गरज पडणार नाही. रेल्वे केबिनमध्ये स्क्रीनवरच पुढचा सिग्नल कोणता आहे, हे आधीच समजते. त्यामुळे गाडी कधी थांबवायची याचा निर्णय योग्यवेळी घेता येणार आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories